Monsoon Updates : प्रतीक्षा संपली; अखेर मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर
अखेर ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून आता आपल्या दारावर धडकण्यासाठी तयार झाला आहे
मुंबई : जून महिन्याचा पंधरवडा ओलांडला तरीही पावसाचा काही थांगपत्ताच नव्हता. पण, अखेर ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून आता आपल्या दारावर धडकण्यासाठी तयार झाला आहे.
नुकतीच मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात शनिवारपासून मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. मुंबई हवामान विभागानं यासंदर्भातील अंदाज वर्तवला.
सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मान्सून पोहचला आहे. शनिवारपर्यंत त्याचा प्रवासा पुढील रोखाने सुरु होऊन तो विदर्भातील उर्वरीत भागातही दाखल होईल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाउस पडेल.
दरम्यान, कुठे मान्सून तग धरत नाही तर कुठे एकाएकी आलेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडवली आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याणमधल्या नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. शहड पूल परिसरात जोरदार पावसामुळे आठवडाभरात दुसऱ्यांदा पाणी साचलं.
सिंधुदुर्गात दमदार पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, वैभववाडीमध्ये दमदार पाऊस झाला आहे. पावसामुळं जिल्ह्यातील काही भागात ऊन तर काही भागात दमट वातावरण आहे. चार दिवसाच्या विश्रांतीनंतर कणकवलीत आलेल्या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला. मात्र पेरणीसाठी अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.