Monsoon Picnic Accidents : महाराष्ट्रात पावसाची सुरुवात झाली आणि अनेकांचीच पावलं पावसाळी पर्यटचनाच्या निमित्तानं विविध ठिकाणांच्या दिशेनं वळली. माळशेजपासून अगदी सिंहगडापर्यंत ठिकठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी दिसून आली. पण, या साऱ्यामध्ये सध्याच्या तरुणाईचा अतिउत्साह मात्र अनेक अडचणी आणि संकटांना आमंत्रण देणारा ठरत आहे. याच अतिउत्साहाचं घातक रुप मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बदलापूर येथील कोंडेश्वर धबधब्यावर पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापूर जवळ असलेल्या सुप्रसिद्ध कोंडेश्वर धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक आनंद लुटण्यासाठी पोहोचतात.पण, काही अतिउत्साही पर्यटक मात्र या धबधब्यावर आपल्या जीवाला मुकतात. कोंडेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या कुंडात पाण्याचा अंदाज येत नसल्याने गेल्या पाच ते सहा वर्षात जवळपास 70 हुन अधिक तरुण तरुणींनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळं या ठिकाणी जाताना प्रत्येक पर्यटकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. रविवारी मात्र सुट्टीच्या दिवसामुळं इथं तोबा गर्दी पाबाटयला मिळाली. 


हेसुद्धा वाचा : मोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदा 


अनेक पर्यटक कोंडेश्वर परिसर आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी या भागात आले होते. पण, काही अतिउत्साही तरुणांनी या जीवघेण्या कुंड्यात उंचावरून उड्या मारण्यास सुरुवात केली. सुदैवानं इथं कोणताही अपघात घडला नाही. मात्र अशा प्रकारे या कुंडात उड्या मारून जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न अनेक तरुण इथं सतत करताना दिसत होते धक्कादायक म्हणजे, यात लहान मुलांचाही समावेश होता. इथं पाण्याचा प्रवाह इतका वेगानं होता, की एक लहानशी चूकही एखाद्याच्या जीवावर बेतली असती. त्यामुळं या स्टंटबाजांना आळा घालण्याचीच गरज आता भासू लागली आहे. 



पवना धरणात तरुणाचा मृत्यू 


मावळ भागातील पवना धरण परिसरात पावसाळी सहलीसाठी आलेल्या एका कॉलेज तरुणाचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज येथील काही विद्यार्थी रविवारी मावळात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आले होते. त्यापैकी काही तरुण पवना धरणाच्या बॅक वॉटरच्या पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मुळचा दिल्लीचा रहिवासी असलेला अद्वैवता वर्मा हा तरुण पाण्यात बुडाला. स्थानिक ग्रामस्थांनी आणि वन्यजीव रक्षक मावळच्या बचाव पथकानं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत हा तरुण खोल पाण्यात वाहत गेला होता. लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ च्या टीमने या मुलाचा मृतदेह शोध घेऊन पाण्याबाहेर काढला. दरम्यान, पावसाळी सहलींमध्ये अनोळखी किंवा सवयीच्या ठिकाणी जाऊन तिथं अतिउत्साह दाखवणं सध्या घातक सिद्ध होत असून, स्वत:ची आणि इतरांची काळजी घेत पावसाचा आनंद घेण्याचं आवाहन यंत्रणा आणि प्रशासन पर्यटकांना करत आहे.