मुंबई : कोकणात धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यासाठी मुंबईत कोणकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात आल्यात. यात  जादा १५०० एसटी तर  २५६ रेल्वे यांचा समावेश आहे.


एसटी २२ तारखेपासून धावणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता यावेळी जादा गाड्या सोडण्यात आल्यात.  रेल्वेच्या गाड्या दोन महिने आधीच फूल्ल होत असल्यामुळे चाकरमान्यांना एसटीचा आधार असतो. त्यामुळे मुंबईहून येण्यासाठी १५०० जादा एसटी सज्ज आहेत. गतवर्षी १३५० गाड्या फूल्ल झाल्या होत्या. त्यामुळे यंदा १५०० गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एसटीच्या जादा गाड्या मुंबईहून २२ तारखेपासून धावणार आहेत. २२ ते २४ या काळात जादा गाड्या असतील. यात शिवशाही गाडीचाही समावेश आहे.


ऑनलाईन आणि ग्रुप बुकींग


गणेशोत्सवासाठी ऑनलाईन आणि ग्रुप बुकींगची व्यवस्थाही करण्यात आलेय. ५० प्रवाशांचे बुकींग झाल्यास एसटी त्यांना गाडी उपलब्ध करुन देणार आहे. कोकण रेल्वेमार्गावरही मोठ्या प्रमाणात जादा गाड्या सोडण्यात आल्यात. २५६ जादा रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यामध्ये एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचाही समावेश आहे. कोकण रेल्वेच्या जादा गाड्या आजपासून धावणार आहेत.


महामार्गावर गस्तीपथके तैनात


 गणेशोत्सवाच्या काळात मुंबई - गोवा महामार्गावर सुरक्षतेची काळजी घेण्यात आलेय. अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेय. कशेडी ते संगमेश्वर आणि संगमेश्वर ते कशेडी अशी दोन गस्तीपथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच जादा गाड्यांचा बिघाड होण्याची भीती असल्यामुळे फिरते दुरुस्तीपथकही या मार्गावर कार्यरत राहणार आहे.