अखिलेश हळवे, नागपूर : देशातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात तब्बल २४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. विविध बँकांतील सुमारे ५०० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर या संदर्भात कारवाई झाल्याचं आरटीआय अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होतं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनायटेड ब्रेव्हरीज समूहाचे अध्यक्ष आणि लिकर बॅरन अशी ओळख असलेला विजय माल्या देशातील विविध बँकांना सुमारे ९ हजार कोटींचा गंडा घालून लंडनला पळून गेला. यामुळं बँकांतील घोटाळ्यांकडं सर्वांचं लक्ष गेलं. मात्र गेल्या वर्षभरात बँकांमध्ये झालेल्या विविध घोटाळ्यांवर नजर टाकली तर ती संख्या ५ हजार ७७ वर जाते. या सर्व घोटाळ्यांमध्ये देशातील बँकांना तब्बल २३ हजार ९३३ कोटी रूपयांचा फटका बसला आहे. या घोटाळ्यांसाठी जबाबदार असलेल्या २८० अधिकारी आणि कर्मचा-यांना बँकेनं निलंबित केलं आहे.


एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या घोटाळयांसाठी बँक प्रणालीतील त्रुटी कारणीभूत असल्याचं निवृत्त बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय असे घोटाळे होणे शक्य नाही. राजकीय नेते तसंच बिल्डर लॉबीशी हातमिळवणी करून घोटाळे केले जात असल्याचं बँक अधिका-यांनी स्पष्ट केलं आहे.


सुमारे २४,००० कोटींचा हा घोटाळा फक्त देशातील राष्ट्रीयकृत बँकांमधील आहे. यात सहकारी बँकांमधील घोटाळे जोडले तर ही आकडेवारी किती कोटींच्या घरात जाईल, या विचारानंच थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही.