Palghar Accident : अनेक जण पत्नीसह मुलांना सोबत घेवून बाईकवरुन प्रवास करतात. एकाच कुटुंबातील 5 जणांचा बाईकवरुन प्रवास जीवघेणा ठरला आहे. पालघर येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात माय लेकाचा मृत्यू झाला आहे. तर,  तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


डहाणू येथील उड्डाणपुलावर अपघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच कुटुंबातील पाच जणांनी दुचाकीवरून एकत्र प्रवास करणे त्यांच्या जीवावर बेतले आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणू येथील विवळवेढे उड्डाणपुलावर हा भीषण अपघात झाला आहे. दुचाकीला एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी वरील माय लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन मुलींसह कुटुंब प्रमुख गंभीर जखमी झाला आहे.  या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


या भीषण अपघातात दुचाकी वर बसलेल्या केरू बारकू डवला (40 वर्षे) आणि जैविक बारकु डवला या मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकी चालवणारे वडील बारकू डवला (वय 45 वर्षे) आणि त्यांच्या दोन लहान मुली सुवर्णा डवला (वय 13 वर्षे) आणि प्राची डवला (वय 10 वर्षे) हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.


रुग्णालयात निघाले असताना झाला भीषण अपघात


पालघर तालुक्यातील सातिवली येथील  बारकू डवला पत्नी केरु आणि तीन मुलांना घेऊन धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात जाण्यासाठी निघाले होते. सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बाईकला भीषण अपघात झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात वाहिनीवर विवळवेढे येथील महालक्ष्मी मंदिरासमोरील उड्डाणपुलावर याच्या बाईकला भरधाव वाहनाने धडक दिली. 


बारकु डवला यांच्या बाईकला एका अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक देऊन फरफटत नेले. अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीस आणि महामार्ग वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.  स्थानिक तरुणांच्या मदतीने जखमींना कासा रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. डवला यांच्या बाईकला धडक देणारा वाहन चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. अपघातानंतर  पळ काढणाऱ्या अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत.