Ground Report: घरातल्या कापसामुळे सासू-सुनांमध्ये वाढला वाद, नेमकं प्रकरण काय? वाचा स्पेशल रिपोर्ट...
Cotton Farmers : कापसाला कमी भाव येत असल्यामुळे शेतकरी वेचलेला कापूस घरातच साठवून ठेवत आहेत. मात्र आता या कापसामुळे त्याच्यावर नवं संकट उभं राहिले आहे
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : पांढरं सोनं (White Gold) पिकवणारा कापूस उत्पादक शेतकरी (Maharashtra Farmers) हा सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे भाव वाढ होत नसल्याने गेल्या तीन महिन्यापासून घरात कापूस (Cotton) पडून आहे. कापसाला कमी भाव येत असल्यामुळे शेतकरी वेचलेला कापूस घरातच साठवून ठेवत आहेत. नगदी पीक शेतकरी मोठ्या कष्टाने हे सोन्यासारखं पीक उगवतो आहे. मात्र त्याला भावच मिळत नसल्याचे शेतकऱ्यावर मोठं संकट आलं आहे.
शेतकऱ्यांच्या जीवावर उठला कापूस
शेतकऱ्यांच्या अडचणी काही केल्या संपता संपत नाहीयेत. आधी निसर्गाचा प्रकोप झाला आणि पाणी कमी पडल्याने शेतकरी अडचणीत सापडला. थोडाफार कापूस आला मात्र त्यात बोंड अळीमुळे तोही गेला. काही शेतकऱ्यांनी उरला सुरलेला कापूस विकण्यासाठी घरात साठवून ठेवला. भविष्यात भाव वाढतील या आशेने साठवून ठेवलेला हाच कापूस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. कापसातील किड्यांनी व अळ्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्वचारोगाचा प्रादुर्भाव होत आहे.
कापसामुळे सासू सुनेमध्ये वाद
दुसरीकडे कमाई करुन देणारा कापूसच शेतकऱ्याच्या जीवावर उठल्याचे पाहायला मिळत आहे. भाव नसल्याने शेतातून वेचलेला कापूस बाहेरच्या भीतीने शेतकरी घरात साठवून ठेवत आहेत. मात्र या कापसामुळे वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. कापसाची गंजी घरी साठवल्यामुळे शेतकरी कुटूंबातील सदस्यांना मोठ्या प्रमाणावर त्वचारोग होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी कुटुंबीय त्रस्त झालेत. धक्कादायक बाब म्हणजे याच कापसामुळे कुटुंब उद्धवस्त होण्याच्या वाटेवर आहेत. कापसामुळे होत असलेल्या त्वचारोगामुळे अनेक ठिकाणी घरातील सुनांनी माहेरी राहणेच पसंत केले आहे. तर काही ठिकाणी या कापसामुळे सासू सुनेमध्ये वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या कापसामुळे संसार तुटण्याची परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण झालीय. तसेच कापसाला भाव न मिळाल्याने संसार घटस्फोटाच्या मार्गावर आहेत.
उपचारांसाठीही पैसे नाहीत
त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शासनाने या त्वचा रोगाकडे दुर्लक्ष करु नये व घरगुती उपचार करु नये असे आवाहन केले आहे. हा विषय गंभीर असून शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे कापसाचे भाव वाढावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अंगाला सुटलेली खाज यावर इलाज करत करत शेतकरी हैराण झाले आहेत. काही शेतकऱ्यांकडे उपाय करायला देखील पैसे नसल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.