श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : एका आईनेच आपल्या चिमुकल्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. खोकल्याचे औषधात विष पाजून पोटच्या मुलीची आईनेच हत्या केली. आता या प्रकरणी वर्षभरानंतर आईवर  गुन्हा दाखल झाला आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. (mother poisoned her daughter)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षभरानंतर खुनाचा गुन्हा दाखल


शवविच्छेदन अहवाल व विकृतीशास्त्र विभागाच्या अहवालातून खुनाचा उलघडा झाला आहे. तब्बल वर्षभरानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. मुलीला विष पाजल्यानंतर आईने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला तर आई बचावली होती. याप्रकरणी आर्णी पोलिसांनी तपासाअंती निर्दयी मातेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


31 आक्टोंबर 2021 रोजी मुलीला सकाळी उलट्यांचा त्रास सुरु झाला होता. त्यानंतर तिला सुरुवातीला आर्णी ग्रामीण रुग्णालय व नंतर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने तिचा 25 नोव्हेंबर 2021 रोजी मृत्यू झाला. त्यावेळी आर्णी पोलिसांत आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली होती.


शवविच्छेदन अहवाल समोर आला आणि...


मात्र या प्रकरणात, शवविच्छेदन अहवाल व विकृतीशास्त्र विभागाच्या अहवाल प्राप्त झाला आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामध्ये आरोपी आईनेच खोकल्याच्या औषधात विषारी औषध मिसळून पोटच्या 5 वर्षीय मुलीला पाजले. त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रथमदर्शी तपासातून ही माहिती समोर आली आहे. 


त्यावरून आज तब्बल एक वर्षानी पोलिसांनी आरोपी आईविरुद्ध आर्णी पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम 302, 309 प्रमाणे 18 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत कालुसे करत आहे. परंतु आईने आपल्या चिमुकलीचा खून का केला असावा,हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीतच आहे.