Maharashtra Politics : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रिया चक्रवर्तीला अनेक फोन केल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी बुधवारी केल्यानंतर खळबळ उडाली आहे. राहुल शेवाळे यांच्या आरोपांनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्याबाबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. राहुल शेवाळे यांचे मैत्रिणीबरोबरचे फोटो आम्ही पाहिले आहेत असं खैरे यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल शेवाळे यांचे आरोप काय?


सुशांत सिंग याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीच्या मोबाइलवर 40 पेक्षा अधिक फोन आले होते. हा नंबर AU या नावाने तिच्या मोबाइलमध्ये होता. AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा त्याचा अर्थ होता, अशी माहिती मला बिहार पोलिसांकडून मिळाली असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला. याबाबत चौकशी करण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.


"आठ आठ दिवसात राहुल शेवाळे महिला पत्रकारांसोबत परदेशात असायचे"


"राहुल शेवाळे विचित्र आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचे. पण मला त्यांचे भांडे फोडायचे आहे. आज ते मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत. ते काय होते मला माहिती आहे. लोकसभेत असताना त्यांचे इश्क करतानाचे फोटो आम्ही पाहिले आहेत. आठ आठ दिवस ते महिला पत्रकारांसोबत परदेशात असायचे. राहुल शेवाळे यांची पत्नी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊन रडायला लागली. माझं आयुष्य बरबाद झालं असून मला रोज मारहाण केली जाते. त्या महिला पत्रकारासोबत ते फिरतात. मी काय करु? त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण मिटवले आणि त्यांचा संसार चांगला करुन दिला. आता तोच माणूस उद्धव ठाकरेंच्या विरोधात जात आहे," असे चंद्रकांत खैरे म्हणाले.


यापुढे मुंबईतून ते निवडून येणार नाहीत - चंद्रकांत खैरे 


"यापुढे जर त्यांनी मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले तर आम्ही त्यांना दाखवून देऊ. त्यांना सरळ करुन टाकू. हे असे चालणार नाही. असे कित्येक येतात आणि कित्येक जातात. यापुढे मुंबईतून ते निवडून येणार नाहीत," असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.


राहुल शेवाळे ठाकरे गटाच्या निशाण्यावर


राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप केल्यानंतर ते आता ठाकरे गटाच्या निशाण्यावर आले आहेत. राहुल शेवाळे यांच्यावर अत्याचाराचे आरोप केलेल्या महिलेला मुंबईत यायचे आहे, तिला येऊ दिले जात नाही, अत्याचार आणि बलात्काराचे आरोप असतांनाही कारवाई होत नाही. त्यामुळे याप्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी आमदार मनिषा कायंदे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.