मुख्यमंत्र्यांचे पुत्र सहकुटुंब पंतप्रधान मोदी यांच्या भेटीला; चर्चा मात्र एकनाथ शिंदे यांच्या नातवाचीच
Shrikant Shinde : सत्तातरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश हा चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्या रुद्रांशसोबत वेळ घालवत त्याला खाऊसुद्धा दिला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
PM Modi Meet Shrikant Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करत या भेटीची माहिती दिली. यावेळी नेहमीच चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाने पंतप्रधान मोदी यांचेही मन जिंकून घेतले. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.
"जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर मुलांमध्ये मिसळावे, त्यांच्या भावनांशी एकरूप व्हावे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. जेव्हा जेव्हा बालकांच्या सहवासाची संधी मिळते तेव्हा ते स्वतःलाही विसरतात. आजही असंच झालं!
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली आणि माझा मुलगा चि.रुद्रांश सोबत मोदीजींनी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधत त्याला आशीर्वाद दिले. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांनी दिलेला खाऊचा रुद्रांशने देखील हास्यमुखाने आनंदाने स्विकार केला. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री मोदीजी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांची देखील विचारपूस करित कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. यासमयी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांना श्री गणेशाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला," असे श्रीकांत शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दसरा मेळाव्यातील उल्लेखानंतर रुद्रांश शिंदे चर्चेत
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातू आणि श्रीकांत शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे पुत्र रुद्रांश शिंदे याचा उल्लेख केला होता. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात "बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या," असा उल्लेख केला होता. त्यामुळे शिंदे कुटुंबियांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.