MPSC students Protest Pune Big Update: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षार्थ्यांनी पुण्यामध्ये केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. एमपीएससी विद्यार्थी केलेल्या आंदोलनानंतर 25 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.


आंदोलन आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यामध्ये मंगळवारपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन (MPSC Protest Pune) सुरुच होतं. बुधवारी रात्री पुण्यातील रस्त्यांवर उतरुन विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर आज सकाळपासून त्यांनी रस्ता आडवून धरला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे म्हणजेच एमपीएससी मार्फत 25 ऑगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागातील 258 पदांचा समावेश करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. याच मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी पुण्यात मंगळवारी रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. बुधवारी रात्रभर हे आंदोलन सुरू होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.


या बैठकीमध्ये एमपीएससी कृषी आणि आयबीपीएस विषयावर चर्चा झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व भाजपा आमदार अभिमन्यू पवार बैठकीस उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने लोकसेवा आयोगाला कृषीच्या 258 पदांचा समावेश करावा अशी अधिकृतपणे विनंती केली आहे. तसेच आयबीपीएस परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी असल्याने एमपीएसीची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली.


नक्की वाचा >> '...तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन...'; शरद पवारांचा शिंदे सरकारला अल्टीमेटम


मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आयोगाचा निर्णय


या बैठकीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आयोगाची बैठक घेतली आणि त्यानंतर सोशल मीडियावरुन परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचं जाहीर केलं. "आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल," असं आयोगाने जाहीर केलं आहे.



या निर्णयानंतरही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच असल्याची माहिती समोर येत आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्यांपैकी एक मागणी मान्य झालेली नाही असं त्यांचं म्हणणं असून सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं म्हटलं आहे.