ठाण्यात प्रियकरानेच आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यात 11 डिसेंबरला  हा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अनिल गायकवाड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा आहे. अश्वजित गायकवाड अशी त्याची ओळख पटली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित तरुणी प्रिया सिंगने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला सगळा घटनाक्रम सांगितला आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, अश्वजितने फोन केल्यानंतर 11 डिसेंबरला सकाळी 4 वाजता एका कौटुंबिक कार्यक्रमात त्याला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी तो थोडा विचित्र वागत असल्याचं तिच्या लक्षात आलं. यानंतर तिने त्याला खासगीत बोलण्यास सांगितलं. दरम्यान यावेळी अश्वजितसोबत त्याचा एक मित्र होता जो तिचा अपमान करु लागला होता. आपण अश्वजितला आपली बाजू घेण्यास सांगितलं असता त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली अशी माहिती प्रियाने दिली आहे. 


"माझ्या प्रियकराने मला कानाखाली लगावली, गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मी त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याने माझा हात चावला, मारहाण केली, केस ओढले. त्याच्या मित्राने मला खाली जमिनीवर ढकललं," असं प्रिया सिंगने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं आहे.


आपण आपला फोन आणि बॅग घेण्यासाठी अश्वजितच्या कारकडे धाव घेतली असता त्याने चालकाला माझ्या अंगावर गाडी घालण्यास सांगितली. माझ्या पायावरुन गाडी घातल्यानंतर ते पळून गेले असा आरोप प्रियाने केला आहे. 



"मी रस्त्यावरच जवळपास अर्धा तास वेदनेत पडलेले होते. अखेर एक अज्ञात व्यक्ती माझ्या मदतीसाठी थांबला आणि त्याने पोलिसांना फोन केला. काही वेळाने अश्वजितचा कारचालक मी जिवंत आहे का हे पाहण्यासाठी परत आला होता. त्याने अज्ञात व्यक्तीला पाहिल्यानंतर पोलीस कारवाई टाळण्यासाठी मला गाडीतून रुग्णालयात नेलं. पण यावेळी त्याने गाडीत मला यामध्ये पोलिसांना आणू नको अशी धमकी दिली," असा आरोपही तिने केला आहे. 


"माझा उजवा पाय मोडला असून, सर्जरी करावी लागली. पायात रॉड घालावा लागला आहे. माझ्या संपूर्ण शरिरावर जखमा आहेत. माझा हात, पाठ, पोट येथे गंभीर जखमा झाल्या आहेत," अशी माहिती प्रियाने दिली आहे. मी आणि अश्वजित साडे चार वर्षांपासून संबंधात होतो अशीही माहिती तिने दिली आहे. 


प्रियाच्या आरोपानुसार, तिने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण वरिष्ठांचा दबाव असल्याने त्यांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला. पण सोशल मीडियावर फोटो आणि घटना शेअर केल्यानंतर त्याच पोलीस ठाण्यात अश्वजित गायकवाड आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


प्रिया सिंगवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुन्हा दाखल केल्याने अश्वजितचे मित्र आपल्याला आणि बहिणीला धमकावत असल्याचा आरोपही तिने केला आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करुन न घेतल्याचा आरोप फेटाळला आहे. या प्रकरणी तपास सुरु असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.