Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: राज्याच्या विविध भागात लागलेल्या महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. झुंबड उडालीय ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी... राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेतील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळं कागदपत्रं आणि नोंदणी करण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडाली. त्याचाच गैरफायदा घेऊन अनेक ठिकाणी एजंटांनी आणि सेतू केंद्र चालकांनी 500 ते 600 रुपये उकळायला सुरूवात केलीय. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये लुटीचा असाच धक्कादायक प्रकार उजेडात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेली ही लूट थांबवावी, अशी मागणी विधिमंडळात देखील करण्यात आली. राज्य सरकारनं या प्रकारांची गंभीर देखल घेऊन कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत. कुणी अडवणूक किंवा पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. तर एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केल.


दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये राज्य सरकारनं अनेक महत्त्वाचे बदल केलेत.


लाडकी बहीण योजनेत बदल


1. 21 ते 65 वयोगटातील महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील.
2. ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान दिलं जाईल.
3. पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या महिलांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही.
4. आदिवास प्रमाणपत्राची अट शिथील करण्यात आलीय.
5. 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल.
6. 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलीय.
7. एका कुटुंबातील 2 महिलांना योजनेचा लाभ मिळेल.
8. परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह झाल्यास त्या महिलेलाही लाभ मिळेल, असं सरकारनं स्पष्ट केलंय.


दरम्यान, लाडकी बहीण योजनेमुळं राज्यातील लाखो महिलांचं आयुष्य बदलून जाणार आहेत. मात्र गरज आहे ती ख-या गरजू महिलांच्या खात्यात ती रक्कम जमा होण्याची... योजनेच्या नावाखाली लुटीचा धंदा सुरू करणा-या एजंटांना चाप लावण्याची देखील गरज आहे.