मुंबई - गोवा महामार्गाबाबत भास्कर जाधव यांची लक्षवेधी, सभागृहात एक तास चर्चा
Maharashtra Budget Session 2022 : मुंबई - गोवा महामार्गाचा (Mumbai-Goa highway) प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या महामार्गाच्या चौपदरीकरणावरुन मुबंई उच्च न्यायलयाकडून सरकारची खरडपट्टी काढण्यात आली होती.
मुंबई : Maharashtra Budget Session 2022 : मुंबई - गोवा महामार्गाचा (Mumbai-Goa highway) प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या महामार्गाच्या चौपदरीकरणावरुन मुबंई उच्च न्यायलयाकडून सरकारची खरडपट्टी काढण्यात आली होती. तसेच जनतेतून तीव्र नाराजी आहे. आज महामार्गाच्या कामाबाबत गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्यानंतर एक तास चर्चा करण्यात आली. परशुराम घाट, कशेडी घाट यांचे रुंदीकरण आणि पर्यायी रस्ता यावर चर्चा झाली. तसेच ट्रामा केअर सेंटर उभारण्याची मागणी सदस्यांनी केली.
मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटाचे काम अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत सुरु आहे. पण तरीही या घाटाचे काम मे 2022 पर्यंत पूर्ण होईल. तसेच परशुराम घाट ते आरवलीपर्यंतच्या या 34 किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम 31 मे 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या परशुराम घाटातील चौपदरी रस्त्याच्या संदर्भात विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सुचना मांडली. मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम, धोकादायक झालेला परशुराम घाट, सततच्या दुर्घटनांमुळे पेढे गावातील ग्रामस्थ आणि घाटातील सुरक्षेचा प्रश्न याकडे सभागृहाचे लक्ष भास्कर जाधव यांनी वेधले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार पाहणी?
मुंबई - गोवा महामार्गावरील किती टक्के रस्ता पूर्ण झाला त्याची आकडेवारी बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी सभागृहात सादर केली. त्यावर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. सरकारी अधिकारी मंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यापेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना या महामार्गाच्या कामाची पाहाणी करण्यासाठी आमंत्रित करा अशी सूचना केली. अशोक चव्हाण यांनी ही सूचना मान्य केली. त्यावर आपण त्यांना आमंत्रित करू, असे आशिष शेलार म्हणाले.
ट्रामा केअर सेंटर उभारा
मुंबई - गोवा महामार्गावर प्रत्येक 100 ते 200 किमी अंतरावर ट्रामा केअर सेंटर उभारण्याची सुचना शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. ट्रामा केअर सेंटर उभारल्यास अपघातग्रस्तांचे जीव वाचतील असे प्रभू म्हणाले. तर ओणी येथे ट्रामा केअर सेंटरची मागणी शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केली. चिपळूणमध्ये ट्रामा सेंटर उभारण्याच्या दृष्टीने आखणी करून त्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाला पाठवून मंजुरी घेण्याचे आश्वासन अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले.
परशुराम घाटात बोगदा
कशेडी घाटात 17 किमी लांबाची बोगदा होत आहे. परशुराम घाटातील अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन या घाटात बोगदा बांधण्याची सुचना शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी केली. तसेच पीर लोटे ते कळंबसे पर्यायी मार्गावर विचार करण्यात आला. घाटाचा रस्ता बंद झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून पीर लोटे ते कळंबसे फाट्यापर्यंतच्या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा देऊन सिमेट काँक्रीटचा रस्ता करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.