रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली. पूर्ण डोंगरच महामार्गावर कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  सळधार पावसाने रत्नागिरी, रायगड आणि बदलापूरला झोडपून काढले आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण येथे परशुराम घाटातही दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्ग ठप्प पडला आहे. आज दुपारी या घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगबुडी नदीनेही धोक्याची पातळी गाठली आहे. त्याचा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीलाही फटका बसला. तसेच पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली. यामुळे वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग बंद पडल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे.  दरड कोसळून रस्त्यावर दगड माती आल्याने आणि पावसामुळे माती खाली येण्याची घटना सुरुच आहे.  बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत रस्त्यावर आलेली माती हटविण्यास सुरुवात केली आहे.



त्याआधी कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला. त्यामुळे तीन गाड्या कोलाड, वीर आणि करंजाडी येथे थांबविण्यात आल्या होत्या. तीन तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होती. माणगावमधील घोट नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होते. त्यामुळे रत्नागिरी - दादर ही लोकल वीर येथे तर दिवा - सावंतवाडी ही गाडी कोलाड येथे थांबविण्यात आली होती. मंगला एक्स्प्रेस ही गाडी करंजाडी येथे थांबवून ठेवण्यात आली. मांडवी एक्स्प्रेस रोहा येथे थांबविवली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तीन तासानंतर थांबविण्यात आलेल्या गाड्या आता मार्गस्थ करण्यात आल्या आहेत.