प्रफुल्ल पवार / स्वाती नाईक, झी मीडिया, कर्नाळा : मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम सुरु आहे. यासाठी गावकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येतायत. मात्र नेत्यांच्या जमिनी संपादित करताना विलंब करण्यात येत असल्याचा आरोप होतोय. कर्नाळा जवळच्या तारा गावाजवळील निलेश फार्म... माजी मुख्यमंत्री नारायण राणेचं हे फार्म हाऊस... मात्र, सध्या हे फार्म हाऊस चर्चेत आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुरु असलेल्या भूसंपादनातून याच फार्म हाऊसचा भाग वगळण्यात आल्याचा आरोप होतोय. भूसंपादनावेळी छोट्या जागेला मोठी किंमत तर मोठ्या जागेला कमी किंमत देण्यात आली असल्याचा आरोपही करण्यात येतोय. शिवाय स्थानिक गावकऱ्यांची घरं तातडीने संपादित करण्यात आली, मात्र नेत्यांना अभय देण्यात आलं, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय.


महसूल विभागाचं स्पष्टीकरण


या आरोपानंतर महसूल विभागाने यावर स्पष्टीकरण दिलंय. नारायण राणे आणि त्यांची पत्नी निलम राणे यांच्या नावावर असलेल्या या फार्म हाऊसमधील सुमारे २१ गुंठे जमीनही चौपदरीकरणातही जातेय. त्‍याचा काही भाग संपादीत करण्‍यात आला. राणे यांना या जमिनीचा १ कोटी ५२ लाख ३७ हजार ५१५ रुपये मोबदला देण्‍यात आला. ही रक्‍कम त्‍यांना २०१७ व २०१८ या दोन वर्षात टप्‍प्‍याटप्‍प्‍याने देण्‍यात आलीय. या संपादित जागेवरील बांधकाम हटवण्यात आलं नसलं तरी ते पावसाळ्यानंतर हटवलं जाईल, असं स्पष्टीकरण भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिलंय. 


दुसरीकडे कोलाड नाक्‍यावरील तटकरे कुटुंबियांचे जुने राहते घर संपादित करण्‍यात आलंय. ती जागा त्‍यांनी त्‍वरीत मोकळी करून दिली असून त्‍याचा मोबदला म्‍हणून २५ लाख ८७ हजार ३९ रूपये इतकी रक्‍कम नोव्‍हेंबर २०१४ मध्‍येच अदा करण्‍यात आल्याची माहिती देण्यात आलीय.