महाड : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणी माणसाचे मेगाहाल होत आहेत. मुंबई ते रायगड जिल्ह्यातल्या महाड या १०० किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल २२ तासांचा वेळ लागत आहे. काल रात्री मुंबईतून निघालेले अनेक गणेशभक्त अजूनही महाड आणि माणगावच्या आसपासच अडकून आहेत. मुंबई-गोवा हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी वाहतुकीसाठी केलेलं नियोजन पूर्णपणे फसल्याचं दिसतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणी माणसाला मुंबईतच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काल रात्रीपासून चेंबूर ते वाशीनाका परिसरात तुफान वाहतूक कोंडी होती. हीच स्थिती पेण, नागोठणे परिसरातही होती. वाहतुकीचं कोणतंही नियोजन नसल्यानं हाल सोसतच मुंबईकरांना कोकणातलं गाव गाठावं लागतं आहे.


पाऊस आणि रस्त्यावरील खड्डे यामुळं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे महामार्गावर चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे असल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे.