Maharashtra Weather News: पावसाळ्याचे दिवस सुरु असताना गेली अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. अनेक दिवसांच्या दांडीनंतर पाऊस पुन्हा हजर झालाय आणि सर्वात आधी त्याने मुंबईकरांना झोडपायला घेतलं. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र शनिवारपासून पुढील दोन दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर कोकणात आणि घाट माथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत 23 ऑगस्टच्या संध्याकाळी मोठी सर येऊन गेल्यानंतर मुंबईकरांची 24 ऑगस्टची पहाट मुसळधार पावसाने झाली. आठवड्याच्या शेवटी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. हवामान विभागाच्या अंदाजाला खरे ठरवत पावसाने सुरुवात तर केलीय. पण आजचा आणि उद्याचा दिवस कुठे किती पाऊस पडणार? याबद्दलचा हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईकर पावसाची वाट पाहत होते. 15 दिवस गेले तरी मुंबईकरांना पावसाने आपले रुप दाखवले नव्हते. पण शुक्रवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यानंतर मुंबईकरांना गरमीचा सामना करावा लागला. असे असताना पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा विकेंड धुंवाधार पावसात जाणार आहे. 


कुठे अतिमुसळधार?


हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संपूर्ण जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला होता. पण ऑगस्ट मध्यापर्यंत गायब झालेला पाऊस पुन्हा परतलाय. कोकणातही पावसाचे प्रमाण अधिक होते. जोरदार सरी बरसल्याने धरणांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 


पाऊस गुडूप, मुंबईकर उकाड्याने हैराण 


मध्येच पावसाने दडी मारल्याने मुंबईकर गरमीने हैराण झाले आहेत. पावसाळा ऋतुमध्ये भर दुपारी मुंबईकरांना उन्हाचे चटके सोसावे लागत होते. कमाल तापमानाचा पारा दोन ते तीन अंशानी चढा आहे. गुरुवारी सांताक्रूझ केंद्रात 33.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान असून सरासरीपेक्षा 3.3 अंशानी अधिक नोंदले गेले. याआधी 18 ऑगस्ट रोजी 33.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.


कुठे मुसळधार?


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, कोल्हापूर मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आले आहेत. 


कुठे मुसळधार ते अतिमुसळधार?


मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन हवामान विभागाने वर्तवले आहे. 


कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस? 


अकोला, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.