Pune Serial Bomb Blast Case:  पुण्यामध्ये 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 मध्ये झालेल्या साळखी बॉम्बस्फोटातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी न्यायालयाने या आरोपीला जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. जामीन मंजूर करण्यात आलेल्या आरोपीचं नाव मुनीब इक्बाल मेमन असं आहे. मुनीब इक्बाल मेमन मागील 12 वर्षांपासून तुरुंगात होता. आता त्याची जामीनीवर मुक्तता करण्यात आली आहे. 


न्यायालयामध्ये काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई उच्च न्यायालयामध्ये शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुनीब इक्बाल मेमनला जामिनावर सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने मुनीब इक्बाल मेमनला दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने त्याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष न्यायालयाने मुनीब इक्बाल मेमनची जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्यानंतर मेमन याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तिथे त्याला जामीन मंजूर करण्यात आला. 1 ऑगस्ट 2012 रोजी पुण्यात जंगली महाराज रोडवरील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये दहशतवादीविरोधी पथकाने आठ जणांना अटक केली होती. त्यामध्ये मुनीब इक्बाल मेमनचाही समावेश होता. या प्रकरणी जामीन मंजूर झाल्याने आता मुनीब इक्बाल मेमन बाहेर आला आहे.


...म्हणून दिला जामीन


खटल्याची सुनावणी वेळेत पूर्ण झाली नाही. मागील 11 वर्षांपासून हा खटला सुरु असून आरोपी म्हणून 12 वर्षांहून अधिक काळापासून मुनीब इक्बाल मेमन तुरुंगात असून अशाप्रकारे त्याला अटक करुन ठेवणं हा कलम 21 अंतर्गत येणाऱ्या वेगवान न्यायाच्या मूलभूत हक्काचा भंग करण्यासारखं असल्याचं मेमनचे वकील मुबीन सोलकर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितलं. 2013 साली सुरु झालेली या प्रकरणाची सुनावणी डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र तसं घडलं नाही.


सहापैकी 5 बॉम्ब फुटले


जंगली महाराज रोडवर 1 ऑगस्ट 2012 मध्ये 5 साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात एक जण जखमी झाला होता. डेक्कन परिसरातील 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यातील 5 बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटले, तर एक बॉम्ब फुटला नव्हता. तो बॉम्ब शोध व नाशक पथकाने निकामी केला होता. पुणे पोलिस, दहशतवादविरोधी पथक आणि दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली होती. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला होता. 


 


साथीदाराचा एप्रिलमध्ये कॅन्सरने मृत्यू


अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक फिरोज उर्फ हमजा अब्दुल सय्यदचा याच वर्षी एप्रिल महिन्याच्या 7 तारखेला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सय्यदला कॅन्सर झाला होता. सय्यदची प्रकृती खालावल्याने मार्च महिन्यामध्ये त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फिरोज सय्यद हा लष्कर परिसरात टेलरिंगचा व्यवसाय करीत होता. तो ‘लष्कर-ए-तय्यबा’चा दहशतवादी फैय्याज कागझीच्या संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा होता. त्याने कासारवाडी येथे भाड्याचा फ्लॅट घेऊन अन्य आरोपींसाठी ‘शेल्टर’ तयार करून दिले होते. तसेच सय्यदने फ्लॅटवर स्फोटके, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जमविल्या होत्या. जंगली महाराज रोडवर प्रत्यक्ष स्फोटके पेरण्यातही सय्यदचा सहभाग होता, असा ठपका पोलिसांनी ठेवला होता. अटकेची कारवाई झाल्यानंतरपासून रुग्णालयात दाखल होईपर्यंत फिरोज ऑर्थर रोड जेलमध्ये होता. सय्यदचा साथीदार मुनीब इक्बाल मेमन मात्र आता तुरुंगाबाहेर पडला आहे. आरोपींपैकी दोघांना आधीच जामीन मिळाला आहे. दोघेजण तिहार तुरुंगात आहेत. एकाचा मृत्यू झाला असून अन्य आरोपी मुंबईजवळच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.