Mumbai Local Update: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना समोर ठेवून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासाठीही रेल्वेच्या अर्थसंकल्पात 15 हजार 554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात मुंबई लोकलसह राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. तसंच, मुंबई लोकलबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर मंजूर करण्यात आले असून या रेल्वे कॉरिडॉरमुळं 40 हजार किमीचे नवे रेल्वे मार्ग तयार होणार आहेत. बजेटमध्ये महाराष्ट्र व मुंबई लोकलला काय मिळालं आहे? यावर एक नजर. 


मुंबईकरांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आलं आहे. यामार्फत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. यापैकी एक असलेल्या एमयुटीपी 2,3 आणि 3 ए हे प्रकल्प बाकी आहेत. मुंबई महानगरातील रेल्वे प्रकल्पासाठी 789 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळं रखडलेलेल प्रकल्प मार्गी लागणार आहेत. 


मुंबई महानगरातील रेल्वे प्रकल्पांसाठी एमयुटीपी -2 प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गंत, सीएसएमटी ते कुर्लापर्यंतची पाचवी व सहावी मार्गिका आणि मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिका हे प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. 


एमयुटीपी 3 प्रकल्पासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गंत विरार -डहाणू मार्गाचे चौपदरीकरण, पनवेल-कर्जत नवीन रेल कॉरिडॉर, ऐरोली-कळवा नवीन उन्नत मार्ग, नवीन लोकल, रुळांवरील अपघात रोखण्याचे उपाय, असे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. 


एमयूटीपी 3ए प्रकल्पाला 388 कोटी मिळाले आहेत. याअंतर्गंत गोरेगाव-बोरीवली पर्यंत हार्बर मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. तर, बोरिवली आणि विरार दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्यात येणार आहे. तसंच, कल्याण-बदलापूरदरम्यान तिसरी- चौथी मार्गिका, कल्याण यार्ड रीमॉडलिंग असे अनेक रेल्वेचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या सेवेत नवीन एसी लोकल दाखल होणार. 


अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पांसाठी करण्यात तरतूद करण्यात आल्यानंतर येत्या सहा ते सात वर्षांत हे प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहेत. हे प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ आणि सोप्पा होणार आहे. तसंच, या रेल्वे प्रकल्पांतर्गंत रेल्वे स्थानकांमध्ये विविध सुधारणादेखील करण्यात येणार आहेत.