मुंबई : गुरुवारी मुंबईसह उपनगरात पहाटे पाऊस बरसला. काही क्षण बरसल्यानंतर पाऊस थांबला पण, शहरांवर असणारी काळ्या ढगांची चादर मात्र अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईवर पावसाचा शिडकावा झाला असला, तरीही सर्वांनाच आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. (Mumbai maharashtra rain updates monsoon konkan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी मान्सूच्या मोसमातील पंधरवडा कोरडा गेला. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी निरभ्र आकाश आणि उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले. 


गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याकडूनही 'मान्सून आला रे' अशी भाकितं दिली जात असली तरीही प्रत्यक्षात मात्र पावसाची वाट अडल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे मान्सून पोहोचलेल्या ठिकाणीही पावसाच्या सरींनी मात्र दडी मारली आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. 


आजच्या घडीला राज्यातील धरणांमध्ये 22 टक्के पाणीसाठाच शिल्लक आहे. त्यातच अर्धा जून ओलांडला असल्यामुळं पावसाचं प्रमाण सरासरीहून कमी असेल हेच आता सर्वांनी स्वीकारलं आहे. 


कसा आहे पावसाचा आतापर्यंतचा प्रवास ? 
राज्यामध्ये दक्षिण कोकणातून 10 जूनला मान्सूनचं आगमन झालं. पुढे 11 जूनपर्यंत पावसानं मुंबई- पुणे गाठलं. 13 जूनला त्यानं निम्मा महाराष्ट्र व्यापला. मुख्य म्हणजे मान्सूनआधी मान्सूनपूर्व सरीसुद्धा राज्यात बरसल्या. पुढे मान्सून आला आणि त्यानं आपल्या येण्याची चिन्ह दाखवत रिमझिम पाऊसही झाला. 


असं असलं तरीही मान्सूनच्या गडगडाट आणि मुसळधार पावसापासून संपूर्ण राज्य वंचित असल्याचं पाहायला मिळत आहे. 


पुढल्या पाच दिवसांत 'तो' पुन्हा येईल... 
मान्सूननं सध्या निम्मा महाराष्ट्र व्यापला असून, दोन-तीन दिवसांत त्याची विदर्भात प्रगती होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र पुढील सुमारे पाच दिवस राज्यात काही भागांतच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात मात्र काही भागांत 18 जूनपासून पाऊस जोर धरेल. जूनच्या अखेपर्यंत दक्षिण, उत्तर कोकणासह मराठवाडय़ातील काही भाग, विदर्भातील बहुतांश भागांत पावसाची सरासरी कमी राहील.