मुंबईकरांचा प्रवास आता सुस्साट व सुकर, स्थानकातच उभारणार पार्किंग अन् मिनी मॉल
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 लवकरच धावण्यास सज्ज आहे. मात्र, त्या पूर्वी कफ परेड स्थानकाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो ३ लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यास सज्ज झाली आहे. येत्या डिसेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात मेट्रो 3 धावण्यास सज्ज आहे.आरे कॉलनी ते बीकेसीपर्यंत पहिला टप्पा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वीच मेट्रो 3 बाबत आणखी एक अपडेट समोर येत आहे. मेट्रो 3वरील कफ परेड स्थानक हे अंडरग्राउंड असून या स्थानकात मिनि मॉल, पार्किंगची सुविधाही देण्यात येणार आहे.
कफ परेड मेट्रो स्थानकात सनकेन प्लाझाची रचना करण्यात येणार आहे. मिनी मॉलच्या स्वरुपात हे स्टेशन डिझाइन करण्यात येणार आहे. यात पार्किगची सुविधाही देण्यात येणार आहे. कप परेड मेट्रो स्टेशनमध्ये तीन लेव्हल असणार आहेत. 2.8 लाख स्केअर फुट इतक्या जागेत अंडरग्राउंड हे स्थानक उभारण्यात आलं आहे. स्थानकातच जवळपास 192 गाड्या पार्किंग करु शकता त्यासाठी 43,055 चौरस फुटांच्या जागेत कार पार्किंगची सुविधा देण्यात येणार आहे.
मेट्रो 3 वरील कफ परेड हे स्थानक अनेक सुविधांनी सज्ज असणार आहे. विशेष पार्किंग सुविधांमुळं हे स्थानक विशेष ठरणार आहे. कप परेड स्थानक हे मेट्रो 3 मार्गासाठी एक महत्त्वाचे स्थानक ठरणार आहे. कफ परेड ते आरे कॉलनी पर्यंत ही मार्गिका 33.5 किलोमीटरपर्यंत असून या मार्गावर 27 स्थानके आहेत.
मुंबई मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्यातील काम 91 टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावर आता साइनेज आणि फिनिशिंगते काम बाकी आहे. आरे येथील मेट्रो स्थानक पूर्णपणे तयार झाले आहे. मुंबई मेट्रो 3च्या पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. आरे ती बीकेसीपर्यंत हा पहिला टप्पा असून त्यात 10 स्थानके असणार आहेत. यात 9 स्थानके ही भुयारी असून त्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, इंटरनॅशनल एअरपोर्ट, सहार रोड,डोमॅस्टिक एअरपॉर्ट, सांतक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी, अशी स्थानके पहिल्या टप्प्यात असतील.
मेट्रो 3 चा विस्तार
कुलाबा ते सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेच्या कामाला 2016मध्ये सुरुवात झाली होती. या मार्गावर एकूण 27 स्थानके आहेत. मात्र, आता या मार्गिकेचा विस्तार करण्यात येणार आहे. मेट्रो 3 चा कफ परेडपासून नेव्हीनगरपर्यंत 2.5 किमीने विस्तार होणार असून या दरम्यान नेव्ही नगर हे एकमात्र मेट्रो स्थानक असणार आहे. 2025 पर्यंत या मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार आहे. या विस्तारीत मार्गिकेसाठी अंदाजे २५०० कोटींचा निधी लागण्याची शक्यता आहे.