Mumbai Metro 3: मुंबईतील पहिली भुयारी मेट्रोचे उद्घाटन शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.  ‘कुलाबा – वांद्रे –  सीप्झ भुयारी मेट्रो 3 आता प्रवाशांच्या सेवेत कधी येणार याची माहिती समोर आली आहे.  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) हा टप्पा प्रवाशांसाठी सोमवारपासून खुला करण्याचा निर्णय  घेतला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता आरे – बीकेसी टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकरांची भुयारी मेट्रोची सफर करण्याची इच्छा आता सोमवारपासून पूर्ण होणार आहे. बीकेसी येथील बीकेसी मेट्रो स्थानकात शनिवारी सायंकाळी ६ वाजता पंतप्रधान मोदी यांनी आरे-बीकेसी मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी बीकेसी मेट्रो स्थानक ते सांताक्रुझ मेट्रो स्थानक असा भुयारी मेट्रोचा प्रवासदेखील केला. मुंबईकरही भुयारी मेट्रोची सफर करण्यास उत्सुक आहेत. शनिवारी किंवा रविवारी मुंबईकरांना मेट्रोतून सफर करण्याची ही इच्छा पूर्ण होईल असं वाटत असतानाच मात्र त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


एमएमआरसीएलच्या निर्णयानुसार आरे – बीकेसी टप्पा सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. सोमवारी सकाळी ११ ते रात्री १०.३० या वेळेत भुयारी मेट्रो सेवा कार्यान्वित असणार आहे. मंगळवारपासून सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत भुयारी मेट्रो सेवा कार्यान्वित असेल. एमएमआरसीएलच्या वेळापत्रकानुसार सोमवार ते शनिवार सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत भुयारी मेट्रो सेवा सुरू राहील. तर रविवारी सुट्टीच्या दिवशी मात्र आरे – बीकेसी मार्गिकेवरील सेवा सकाळी ८.३० ते रात्री १०.३० दरम्यान सुरू राहणार आहे. आरे – बीकेसी दरम्यान दररोज भुयारी मेट्रोच्या ९६ फेऱ्या होणार आहेत. तर प्रत्येक साडेसहा मिनिटांनी मेट्रो गाडी सुटणार आहे.


आरे – बीकेसी मार्गिकेवरून मुंबईकरांना आरे जेव्हीएलआर, सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, विमानतळ टी  १, सांताक्रुझ, वांद्रे शासकीय वसाहत आणि बीकेसी अशा ठिकाणी पोहोचता येणार आहे. भुयारी मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना १० ते ५० रुपये मोजावे लागणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे आरे – बीकेसी अंतर आता भुयारी मेट्रोमुळे केवळ २२ मिनिटांत पार करता येणार आहे. सध्या रस्ते मार्गे हे अंतर पार करण्यासाठी एक तासापेक्षा अधिक अवधी लागतो.