सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक...; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू
Mumbai News Today: मुंबईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कारमध्ये अडकून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खेळता खेळता गाडीत अडकून गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
साजिद मोहम्मद शेख, ७ आणि रीना, ५ या दोघा सख्ख्या बहीण भावांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही दुपारपासून बेपत्ता होते. पोलिसांकडून व कुटुंबीयांकडून या दोघांचा शोध सुरू होता. पोलिसांनी शोध सुरू केल्यापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या कारमध्ये दोघांचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, साजिद आणि मुस्कान दोघेही काल दुपारपासून बेपत्ता होते. घरच्यांनी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच तपास लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी लगेचच शोधकार्य हाती घेतले. त्यानंतर घरापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या एका भंगारातील वाहनात दोघे बेशुद्धावस्थेत असलेले आढळले. त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, श्वास गुदमरुन त्यांचा मृत्यू झाल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मुले खेळता खेळता कारमध्ये बसले असतील आणि कार लॉक झाल्याने श्वास गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र, या दोन चिमुरड्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, सध्या मुंबईत उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाने उन्हात बाहेर फिरणे टाळा, असं आवाहनही केले आहे. येत्या काही दिवसांत उष्णतेच्या लाट येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. अशावेळी उन्हात कारच्या काचा खाली करुन बसा, असा सल्लाही देण्यात येत आहे. लहान मुलांना कारमध्ये बसवून जास्तवेळ ठेवू नका, असंही आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे.