कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर आणि रस्त्यांलगत अनधिकृत 'पार्किंग' होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन वाहनांची गती मंदावत आहे. नागरिकांना आपली वाहने 'पार्क' करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेद्वारे विविध १४६ ठिकाणी तब्बल ३४ हजार ८०८ वाहने 'पार्क'करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सध्या अनेक ठिकाणी वाहनतळांचा वापर न करता जवळच्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग केले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगला शिस्त यावी आणि वाहतूक सुरळीत रहावी, याकरिता वाहनतळांलगतच्या एक किलोमीटरच्या रस्ता;तसेच दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते हे 'नो पार्किंग झोन' म्हणून जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी प्रशासनाला दिले आहेत. याबाबत जनजागृती होण्यासाठी सूचना देणारे फलक लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. ७ जुलैपासून याची अंमलबजावणी करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून 'नो पार्किंग झोन'मध्ये वाहन 'पार्क'केल्याचे आढळल्यास रुपये 1 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.



दंड न भरल्यास वाहन'टोइंग मशीन'ने उचलून नेले जाणार आहे. अनधिकृत पार्किंगबाबत अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना कंत्राटदार नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित कंत्राटदारास माजी सैनिकांची नेमणूक करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर यासाठी आवश्यक त्या प्रमाणात 'टोइंग मशीन' भाड्याने घेऊन वाहतूक पोलीसांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.