मुंबईत ऊन पावसाचा खेळ! येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Rain Update : ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मुंबईकरांनी आज घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे. कारण हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Weather Latest News : ऑगस्ट महिन्यात रुसलेला वरुण राजा पुन्हा एकदा जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर हवामान विभागानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईत ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र सकाळपासून मुंबईत ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज चुकला का अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति-मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. मुंबईत सध्या आकाश उघडे असलं तरी; सध्याच्या हवामान परिस्थितीनुसार येत्या 24 तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येणार नाही, असं हवामान विभागाने सांगितलं आहे.
तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर राज्याच्या अनेक भागात हवामान विभागानं जोरदार कमबॅक केल्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. (mumbai palghar and thane yellow till september 9 today 1 pm alert Maharashtra Weather Update maharashtra rain alert monsoon active imd predicted heavy rain in maharashtra)
राज्यात पुढचे 2 दिवस पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या जोरदार पावसाची शक्यता आहे.
महिनाभर दडी मारुन बसलेल्या पावसानं जोरदार कमबॅक केलंय. पावसाच्या कमबॅकमुळे बळीराजा सुखावलाय.. नाशिकच्या कळवण तालुक्यात रवळजीमध्ये ग्रामस्थांनी चक्क ढोल-ताशाचा गजरात पावसाचं स्वागत केलं.. पावसाचं आगमन होताच आबालवृद्ध ग्रामस्थांनी देहभान हरपून ठेका धरला.. अगदी चिखलात खेळण्याचाही आनंद लुटला..
रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर कायम आहे. यामुळे शहरातील सखल भागांमधले अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले. तसंच चिपळूण बाजारपेठेत पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. तर चिंचनाका बहादूर शेख मार्गावरही वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मुसळधार पावसामुळे गटारचं पाणी रस्त्यावरती आलं.
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. त्यामुळे गोदावरीच्या पात्रातल्या दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी पोहोचलंय.. तर रामकुंड परिसरातली छोटी मंदिरं पाण्याखाली जाण्यास सुरुवात झालीय.. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं तसंच नदी परिसरात सुरु असलेल्या संततधार पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय.
जळगाव जिल्ह्यात सलग तिस-या दिवशी पावसाने हजेरी लावली... त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांना जीवदान मिळालंय... गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकांचं नुकसान होत होतं... मात्र आता झालेल्या पावसानं शेतक-यांना दिलासा मिळालाय...
महिनाभराच्या विश्रांतीनंतर उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली... जोरदार पावसामुळे शेतक-यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळालाय... तर आतापर्यंत पाण्याअभावी करपून गेलेल्या पिकांना या पवसाचा चांगलाच फायदा होणार आहे...
नाशिक जिल्ह्यातल्या नांदूरमधमेश्वर धरणातून मराठवाड्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. धरणाच्या 6 वक्राकार गेट्समधून 24 हजार 579 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. गोदावरी नदीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने दुष्काळाच्या झळा सोसणा-या मराठवाड्यातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झालाय. गोदावरी, दारणा, कादवा या तीन नद्यांच्या संगमावर नांदूरमधमेश्वर धरण आहे. धरणाच्या साठवण क्षेत्रात पुराचं पाणी दाखल होत असल्याने पाणी सोडण्यात आलंय.