Mumbai Police News: मुंबईतील माहीम पोलीस कॉलनीत एकाच वेळी तेरा पोलिसांच्या घरात चोरी झाल्याचं समोर आलं आहे. चोरट्याने थेट पोलिसांच्याच घरात डल्ला टाकण्याचे धाडस केल्याने हा प्रकार सध्या चर्चेत आहे. या घटनेने परिसरातही एकच खळबळ उडाली आहे. तसंच, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीतदेखील कैद झाली आहे. पोलिसांच्याच घरात दरोडे पडत असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यरात्री पोलिसांच्या घरांचा कडी-कोयंडा तोडणारा चौर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मध्यरात्री दबक्या पावलाने पोलिस वसाहतीत येत पोलिसांची घरं बंद असल्याची खात्री करुन घरफोडी करण्यात आली आहे. पोलिसांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तूंची तसेच देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरी करण्यात आली आहे. पोलिस कॉलनीतच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


पोलिसांच्या घरासहं प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयालादेखील चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे. रात्रपाळीवर असलेले पोलीस, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना लक्ष केलं गेलं आहे. माहिम पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे. 



चोरीची ही घटना 16 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान घडली आहे. यावेळी 13 पोलिस अधिकाऱ्यांच्या घरांमध्ये चोरी झाली आहे. ज्यावेळी चोरी झाली तेव्हा घरात कोणीही अधिकारी नव्हते. घर बंद असल्याची खात्री करुनच चोरट्यांनी डाव साधला आहे. पोलिस या परासरातील सीसीटीव्हीची तपासणी करत असून चोरांचा शोध घेतला जात आहे. 


पोलिस जनतेची रक्षा करत असतात अशावेळी पोलिसांची घरेच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांची घरे किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न उभा राहत आहे. 17 तारखेच्या मध्यरात्रीनंतरची ही घटना आहे. पोलिसांच्या एका सीसीटिव्हीत हा सर्व प्रकार कैद झाला आहे. या चोराचा शोध घेण्यात येत आहे. एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.