मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी; बोरघाटात वाहने अडकली
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
Mumbai Pune Expressway : मुसळधार पावसामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी साचले आहे. विकेंड आणि रविवारच्या सुट्टीमुळे नेहमीच मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची गर्दी असते. त्यातच आता पावसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पाणी साचल्याने बोरघाटात अनेक वाहने अडकली आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
मुसळधार मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पाणी साचलं आहे. रायगडमध्ये खोपोलीजवळ बोरघाटात अमृतांजन पुल परिसरात रस्त्यावर पाणी साचलंय. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून वाहनांची वाटचाल सुरु आहे. मुंबईकडे येणा-या लेनवर सखल भागात पाणी साचल्यानं, वाहनांना पुढे येताना खूप कसरत करावी लागतेय. तर वाहन चालकांना पोलीस मार्गदर्शन करताहेत.
खोपोली ते वाकण फाटा महामार्गावरील वाहतूक बंद
खोपोली ते वाकण फाटा महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. संततधार पावसाने अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी साचले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नवीन पुल बांधून देखील प्रवासाला अडथळा निर्माण होत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला जास्त उतार असल्याने पाणी साचले आहे.
नवीन कसारा घाटामध्ये धबधबा पॉईंटजवळ अपघात
नवीन कसारा घाटामध्ये धबधबा पॉईंटजवळ अपघात झाला आहे. याठिकाणी हायवे लगत सहा ते सात वाहन थांबलेले असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलर चा ब्रेक फेल झाल्यामुळे सहा ते सात वाहनांना धडक दिली. यात जवळपास 12 ते 14 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने उभ्या असलेल्या वाहनांमधील काही प्रवासी हे त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांमध्ये नसल्याने बचावले आहेत. यामध्ये आतापर्यंत कोणाच्याही जीवितहानी ची नोंद नाही परंतु कसारा घाट परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी वाहने रस्त्यात वाहने उभी केलेली होती. या ठिकाणी कोणताही पोलीस सुरक्षा रक्षक तैनात नव्हते जखमी झालेल्या नागरिकांना देखील उपचारासाठी रुग्णवाहिका येण्याची वाट पहावी लागली आहे. घोटी टोल नाका परिसरातील रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत.