Mumbai Pune Expressway Tanker Fire: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात एका ऑइल टँकरला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खंड्याळ्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक अनेक तास पूर्णपणे ठप्प झाली होती. सकाळी 11 वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. जी दीडच्या सुमारास एका बाजूने सुरु करण्यात आली आहे. खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली.


ब्रिजवर लागली आग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंडाळ्यात लागलेली ही आग एका ब्रिजवर लागली आहे. या आगीच्या झळा खालील रस्त्यावर पोहचल्या. खंडाळ्यातील जुन्या मार्गावरील अन्य 2 वाहनांनी पेट घेतला आहे. त्यामुळेच एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आग लागल्यानंतर पहिल्या अर्ध्या ते पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर किमान तासभर तरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी लागेल असं पोलिसांनी म्हटलं आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि एक्सप्रेसवे या अपघातामुळे ठप्प झाला होता. पोलिस यंत्रणा, देवदूत यंत्रणा आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एकाच वेळी 3 वाहनांना आग लगल्याची माहिती मिळत आहे. ही आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन जाणाऱ्या टँकरला ब्रिजवर आग लागली. ही आग इतकी भीषण होती की तिच्या झळांमुळे ब्रिजखालील 2 वाहनांनी पेट घेतला. जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील ज्या 2 गाड्यांना आग लागली त्यापैकीच एका गाडीमध्ये ही महिला बसली होती. अचानक गाडीला आग लागल्याने तिला बाहेर पडता आलं नाही. त्यामुळेच ती होरपळली.


फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली


देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातासंदर्भातील माहिती ट्वीटरवरुन दिली आहे. "मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 3 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे," असं फडणवीस म्हणाले.



वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी लागणार काही तास


जखमी व्यक्तींना सोमाटणा फाटा येथील पवना हॉस्पीटल येथील दाखल करण्यात आलं आहे. मात्र या ऑइल टँकरला नेमकी कशामुळे आग लागली यासंदर्भातील तपास आग विझवल्यानंतर केला जाईल असं सांगण्यात आलं आहे. या अपघातामुळे सध्या चारही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. जुन्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच एक्सप्रेसवेवरील वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. ही आग विझवल्यानंतरही कुलिंग ऑप्रेशन आणि इतर गोष्टींचा विचार करता पुढील काही तास वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.