Mumbai Rain : एका दिवसात पडला दोन आठवड्यांचा पाऊस; मुंबईत अद्यापही रेड अलर्ट!
Mumbai Weather News : कधी सुधारणार शहरातील हवामानाची स्थिती? पावसाचा मारा कधी सोडणार पाठ? प्रशासनानं स्पष्टच सांगितलेली आकडेवारी पाहून घ्या.
मनोज कुलकर्णी , झी मीडिया, मुंबई : (Mumbai Rain) हवामान विभागाकडून सप्टेंबरच्या अखेरीस संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एकंदर पर्जन्यमान पाहता मुंबई, पुण्याला तर रेड अर्लट देण्यात आला आणि तेव्हापासूनच मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. महिनाभर रिमझिम पडणाऱ्या पावसानंतर बुधवारी संध्याकाळी शहरात जोरदार पाऊस झाला.
अधिकृत आकडेवारीनुसार बुधवारी मुंबईत दोन आठवड्याचा पाऊस एकाच दिवशी कोसळला आणि मुंबईकरांची दाणादाण उडाली. तर, पालिका प्रशासनाचीही भंबेरी उडाली. अचानक वाढलेल्या या पावासामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन रेल्वे सेवाही प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांना इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी काही मिनिटांच्या ऐवजी अनेक तासांचा कालावधी लागला. सगळ्यात जास्त हाल झाले ते चाकरमान्यांचे, कामावरून निघालेल्या अनेकांना पायी घराची वाट धरावी लागली.
नेमका किती पाऊस पडला?
बुधवारी सकाळपासून मुंबईत ठिकठिकाणी 150 ते 280 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरी विचार करता त्यादिवशी संपूर्ण मुंबईत 131 मिलिमीटर पाऊस झाला. यावरून मुंबईत एकाच दिवशी 15 दिवसांचा पाऊस पडल्याचे हवामान अभ्यासक सांगत आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरातील पावसाची नोंद
मुंबई शहर विभाग
कुलाबा - 169 मिलिमीटर
भायखळा -126 मिलिमीटर
मरीन लाइन्स -104 मिलिमीटर
दादर - 105 मिलिमीटर
माटुंगा - 104 मिलिमीटर
पूर्व उपनगरे
सायन - 124 मिलिमीटर
चेंबूर - 108 मिलिमीटर
मानखुर्द - 208 मिलिमीटर
विक्रोळी 246 मिलिमीटर
पवई 227 मिलिमीटर
पश्चिम उपनगरे
सांताक्रुज - 170 मिलिमीटर
अंधेरी - 123 मिलिमीटर
गोरेगाव - 146 मिलिमीटर
मालवणी - 134 मिलिमीटर
वर्सोवा - 132 मिलिमीटर
आणखी किती दिवस पडणार मुसळधार पाऊस?
एकिकडे संपूर्ण सप्टेंबर महिन्यातील पर्जन्यमानापैकी अर्धा पाऊस तर एकाच दिवसात कोसळला असतानाच, यावर्षी परतीचा पाऊस लांबण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर बांगलादेशापासून या चक्रीय स्थितीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे नेहमी सप्टेंबर महिन्यात परतीचा वाट धरणारा पाऊस अजूनही कमी झालेला नाही. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे. यामुळेच राज्यभरात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांवर तयार झालेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचले जात आहेत. यामुळेच राज्यात पाऊस कायम राहणार आहे. मात्र शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.