उरणहून वेळेत गाठता येणार मुंबई; जानेवारीपासून प्रवाशांचा प्रवास सोप्पा होण्याची शक्यता
Navi Mumbai Local Train Update: तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग येत्या काही दिवसांत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उरणकरांना आता वेळेत मुंबई गाठता येणार आहे.
Navi Mumbai Local Train Update: कित्येक वर्षांपासून उरण-नेरूळ रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग सुरू होण्याची प्रवासी आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, कोणत्या न् कोणत्या कारणांनी या रेल्वेमार्गाचे लोकार्पण लांबणीवर पडत आहे. रायगड जिल्ह्यातील खारकोपर ते उरण मार्गावर रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात नवीन अपडेट समोर येतेय.
न्हावा-शिवडी अटल सेतू प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याच कार्यक्रमादरम्यान उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 12 जानेवारी रोजी उरण-नेरुळ रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या रेल्वे मार्गाचे उद्घाटन लवकर करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे.
उरण-खारकोपर रेल्वे मार्गाच्या चाचण्या होऊन अनेक महिने उलटून गेले आहेत. तसंच, स्थानकांची कामेही आता पूर्ण झाली आहेच. रेल्वे मार्गावर लोकल धावण्यास सज्ज आहे. मार्च 10 रोजी या मार्गावर रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती. अनेक चाचणी फेऱ्या यशस्वीरित्या पूर्णही झाल्या आहेत. 27 किमी लांबीच्या या मार्गावर पहिल्या टप्प्यात नेरूळ, सीवूड्स, सागर संगम, बेलापूर, तरघर, बामण डोंगरी, खारकोपर अशा 12.5 किमी अंतरापर्यंत रेल्वे सेवा सुरू झाली आहे. तर, खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील लोकल सेवा सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
मुंबई गाठता येणार
खारकोपर- उरण रेल्वे मार्गावर पाच स्थानके असून 14.6 किमीच्या रेल्वे मार्गावर गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही पाच रेल्वे स्थानके आहेत. उरण नेरूळ रेल्वे मार्गामुळं सीएसएमटी ते उरण असा थेट रेल्वेप्रवास करता येणार आहे. त्यामुळं मुंबई, नवी मुंबई आणि उरण शहराशी जोडले जाणार आहे. हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
नेरूळ ते उरण रेल्वे मार्गावरील स्थानके
नेरूळ, सीवूड-दारावे, सागरसंगम, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, न्हावाशेवा, रांजणपाडा, द्रोणागिरी आणि उरण या एकूण अकरा रेल्वेस्थानकांचा यात सामावेश आहे.