कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णालय प्रशासनानं उचललं हे पाऊलं
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधितांची एकूण संख्या २६वर पोहचली आहे.
ठाणे : मुंबईसह ठाण्यातही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतो आहे. ठाण्यातील मुंब्रा भागातील कौसा येथील काळसेकर रुग्णालयात काम करणारा एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे. रुग्णालयात काम करणारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्याने रुग्णालय सील करण्यात आलं आहे. या कोरोनाबाधित रुग्णाला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मुंब्र्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या ४वर पोहचली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
याआधी ठाण्यात एका डॉक्टर आणि त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे कळवा हा ठाणे पालिकेतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे संपूर्ण शटडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कळव्यात कोरोना रुग्णांची संख्या १०वर पोहचली आहे.
गर्दी नियंत्रणात येत नसल्याने पालिका प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण कळवा शटडाऊन करण्यात येणार असून केवळ मेडिकल सुरु राहणार आहेत. इतर अत्यावश्यक गोष्टींची फोन वरून डिलिव्हरी मागवण्याचं सांगण्यात आलं आहे. पालिकेने सर्व विभागातील नंबर जाहिर केले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधितांची एकूण संख्या २६वर पोहचली आहे.
तर, मुंबईनंतर आता ठाण्यातदेखील सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास कारवाई होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ठाणे पोलिस आयुक्त विवेक फंसाळकर यांनी परिपत्रक काढलं असून मास्क न वापरल्यास कलम १८८ अंतर्गत कारवाई होणार आहे.