सांगली, जळगाव : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी आणि जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी आज निवडणूक झाली. संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत सांगलीमध्ये सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झालीय. तर जळगावमध्ये ५५ टक्के नागरिकांनी मतदान केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही ठिकाणी सकाळी साडे सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. सांगलीत ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. तर जळगावमध्ये ७५जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये सीलबंद झालंय. या दोन्ही ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडलं. 


सांगलीत मतदारांच्या स्वागतासाठी मतदान केंद्रांवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर सकाळी शहनाईचे सूरही ऐकू आले. सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा तिथं पणाला लागलीय. तर जळगावमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश जैन यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलीय.