शशिकांत पाटील, लातूर : गेल्या १० वर्षांपासून बंगाली समाजातर्फे दुर्गा माता महोत्सवाचे आयोजन केले जाते. मराठवाड्यात औरंगाबादनंतर फक्त लातूरमध्येच बंगाली समाजातर्फे दुर्गा माता महोत्सवाचे आयोजन केले जाते. ज्यात बंगाली मुस्लीमही सहभागी होतात. बंगाली पद्धतीची दुर्गा देवी बनविण्यासाठी कारागीर आणि साहित्य पश्चिम बंगालमधून मागवले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगालमध्ये दुर्गा पूजा हा आपल्याकडील गणेशोत्सवासारखा साजरा केला जातो. त्यामुळे जिथे बंगाली नागरिक मोठ्या संख्येने आहेत तिथे ते दुर्गा पूजा अर्थात दुर्गा मातेचा महोत्सव साजरा करतात. बंगालमधून आलेली सुमारे अडीचशे ते तीनशे कुटुंब लातूरमध्ये स्थायिक झाली आहेत. ही कुटुंब दरवर्षी दुर्गापूजा अगदी मनोभावे साजरी करतात.. त्यासाठी लागणारं सगळं साहित्य कोलकात्यातून आणलं जातं. 


विशेष म्हणजे या बंगाली महोत्सवात बंगाली मुस्लिमही आपला सहभाग नोंदवतात. बंगालमध्ये आम्ही लहानपणापासून दुर्गा पूजेत सहभाग नोंदवत असल्याचे बंगाली मुस्लिम सांगतात.


मराठवाड्यात नवरात्रीच्या उत्सवाला महत्व मोठं आहे. त्यातही लातूरकरांना दरवर्षी बंगली पद्धतीनं साजऱ्या होणाऱ्या या उत्सावात वाद्यांपासून खाद्यांपर्यंत सारं काही अनुभवायला मिळतं. त्यामुळे दुर्गापूजेच्या मंडपात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रांगही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.