Nagaland Election Result: नागालँडमध्ये निळा झेंडा फडकला, आठवले गटाने रचला इतिहास
Nagaland Election Result: नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारही आघाडीवर आहेत. रामदास आठवले यांनी या विजयाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करणार असल्याचं सांगितलं आहे.
Nagaland Election Result: नागालँडमध्ये भाजपा युती सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्रातील पक्षांनीही आपली छाप सोडली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पाच ठिकाणांवर आघाडी असताना दुसरीकडे रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने इतिहास रचला आहे. आठवले गटाने नागालँडमध्ये निळा झेंडा फडकावला असून दोन उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्रात एकही आमदार नसणाऱ्या आठवले गटाचे थेट नागालँडमध्ये आमदार निवडून आल्याने चर्चा रंगली आहे.
राज्यात एकीकडे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे राज्याच्या जनतेचं लक्ष लागलं असताना रामदास आठवले यांनी थेट नागालँडमध्ये आपली छाप पाडली आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर- 2 विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अधिकृत उमेदवार इम्तिचोबा विजयी झाले आहेत. इम्तिचोबा ४०० मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ५५१४ मतं मिळाली. तसंच नोकसेन विधानसभा मतदारसंघातून वाय. लिमा ओनेन चँग विजयी झाले आहेत. त्यांनी ५१५१ मतं मिळाली आहेत.
नागालँडमधून 'ऊस शेतकरी' या निशाणीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक लढली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने एकूण आठ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. यामधील दोन उमेदवार विजयी झाले आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
दरम्यान नागालँडमध्ये झालेल्या विजयानंतर आज दुपारी 3 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
दरम्यान नागालँडमध्ये भाजपा आणि एनडीपीपी युतीचं सरकार येणार असं स्पष्ट दिसत आहे. नागालँडमध्ये भाजपा आणि नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी (NDPP) यांची युती आहे. भाजपाने 60 पैकी फक्त 20 जागांवर तर उर्वरित 40 जागांवर एनडीपीपीने निवडणूक लढली आहे.