नागपूर : 'स्क्रब टायफस' हा गंभीर आजार नागपुरात पाय पसरवत असल्याचे चित्र आहे. या आजाराचे नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात गेल्या २० दिवसात १३ रुग्ण आढळून आले आहेत. ज्यानंतर आरोग्य विभागाला सतर्कतेचे निर्देश देण्यात आले  आहेत.


सूक्ष्म जिवाणूमुळे आजार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मेडिकल रुग्णालयात दाखल झालेल्यापैकी  आठ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे... सर्वाधिक रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील आहे. 'चीगर माईट्स' नावाच्या अतिशय सूक्ष्म जिवाणूमुळे हा आजार होतो. या जिवाणूंचा आकार ०.२ ते ०.४ मिलीमीटर एवढा असतो.


जिथे झाडे-झुडूप आणि गवत वाढलेले असते अशा ठिकाणी हे चिगर माईट्स जिवाणू असतात. अशा ठिकाणाहून जात असताना हा जंतू चावल्यास व्यक्तीला हा रोग होतो.


मळमळ,उलटी,तापाची लक्षणे 


पावसाळा सुरु झाला कि या रोगाचे आगमन होते तर काही ठिकाणी हिवाळ्यात सुद्धा याचा त्रास होतो. वेळीच या रोगाचे निदान व उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची देखील शक्यता असते.


मळमळ,उलटी,ताप येण्यासारखे लक्षणे असलेला रुग्ण दवाखान्यात दाखल झाला तर या आजाराच्या अनुषंगाने देखील त्याचावर उपचार करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.