अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यात अकरा वर्षीय बालकाचा मांजराने चावा घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर मांजराच्या चाव्याने मृत्यू कसा होऊ शकतो अशी शंका अनेकांनी उस्थितीत केली आहे. मुलाच्या मृत्यूने कुटुंबियांना जबर धक्का बसला असून पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगणा तालुक्यातील उखळी गावात बालकाचा मित्रांसोबत खेळताना मांजरीने चावा घेतल्यानंतर काही तासात मृत्यू झाल्याची घटना समोर आली. श्रेयांशु कृष्णा पेंदाम असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे..शनिवारी सायंकाळच्या सुमारास तो काही मित्रांसोबत खेळत होता.यावेळी मांजराने त्याच्यावर हल्ला केला व त्याच्या पायाचा चावा घेतला असे त्याच्या आईला सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्याला मळमळ आणि उलटी सुरु झाल्या अस्वस्थ वाटू लागले. 


आई वडील श्रेयांशुला घेऊन डिंगडोह परिसरातील लता मंगेशकर यांना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी श्रेयांशुला तपासून मृत घोषित केले. तेथून मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला. हिंगणा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकेल.


दरम्यान, मांजराने चावा घेतल्याने मृत्यू ही दुर्मिळ घटना आहे. मांजराने चावा घेतल्यानंतर इतक्या कमी वेळात मृत्यू होणे कठीण आहे. मांजराच्या हल्ल्यामुळे मुलगा घाबरल्याने त्याला ओकाऱ्या आल्या. ओकारी बाहेर न येता घशातून श्वसननलिकेत जाऊन श्वास रोखल्याने हृदयघात झाला असावा. मुलाचा नेमका मृत्यू कशामुळे हे आताच सांगणे कठीण आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल, असे हिंगणा तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण पडवे यांनी म्हटलं आहे.