Nagpur Birthday Hordings: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज (22 जुलै) एकाच दिवशी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघांकडून सत्ताधारी आमदारांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण ईरसालवाडी दुर्घटनेनंतर ही पार्टी रद्द करण्यात आली. दरम्यान दोन्ही नेत्यांचे समर्थक बॅनर्स, पोस्टर्सच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, नागपुरात लावण्यात आलेल्या बॅनरची देखील अशीच चर्चा सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांना नागपुरमधून वाढदिवस आणि मित्रत्वाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ही दोस्ती तुटायची नाय असे होंर्डिंग लावून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून हे बॅनर लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.



नागपुरच्या सेंट्रल एवेन्यूवर हा बॅनर पाहायला मिळत आहे. बॅनरवरील 'ही दोस्ती तुटायची नाय' हे वाक्य साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 


राजकारणातील दादा' अजित दादा आणि राजकारणातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा शुभेच्छा देणारा मजकूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने होर्डिंगवर लिहिण्यात आला आहे. 


'अजितपर्व'ची राजकीय वर्तुळात चर्चा 


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (22 जुलै) त्यांचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे होर्डिंग्स लावले आहेत. राष्ट्रवादीतल्या बंडानंतर अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पद मिळवलं आहे. अशातच अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. पुन्हा राजकीय समीकरणं बदलून मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक ट्वीट केले आहे. 


'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' अशा कॅप्शनसह अमोल मिटकरी यांनी एक अजित पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. "आपल्याला जी गोष्ट पटते लगेच त्यासाठी हो म्हणून टाकतो. परंतु कुणीही उठून सांगितली की माफी मागा. तर माफी मागायला मोकार नाही," असे अजित पवार यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.