नागपूर : भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलाय.  त्यांच्या कार्यालयात एक पत्र आले असून त्यामध्ये राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांना भाजप नेत्यांच्या फोन टॅपिंगसाठी कामी लावल्याचा दावा करण्यात आलायं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच पत्राच्या आधारावर आमदार खोपडे यांनी नागपूरात पोलीस तक्रार केली असून महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांचे फोन टॅप करत असल्याचा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला आहे. तसेच पत्रावर उल्लेख असलेला एक मोबाईल नंबर राज्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कथित भावाचा असल्याचा आरोप ही खोपडे यांनी केला आहे.



या पत्रात पुणे, पिंपरी चिंचवड, जळगाव आणि ठाणे पोलीस दलातील कोणकोणते अधिकारी फोन टॅपिंगच्या कामावर लावण्यात आले आहे त्यांचे नाव ही नमूद करण्यात आले आहे. 


कृष्णा खोपडे यांनी ही त्या नंबरवर संपर्क केले असून ती व्यक्ती जळगाव मधील सोपान पाटील असल्याचे त्या व्यक्तीने फोनवर सांगितल्याचा दावा ही खोपडे यांनी केलाय.


विशेष बाब म्हणजे कृष्णा खोपडे यांच्या कार्यालयात आलेलं पत्र मनीष भंगाळे नावाच्या व्यक्तीने पाठवल्याचं सांगितलं जातंय.


मनीष भंगाळे ही व्यक्ती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला सिडीआर प्रकरणी अडचणीत आणणारी असल्याचेही कथित वृत्त आहे.