प्रोजेक्ट तयार करण्याचा प्रयत्न बेतला जीवावर; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
या घटनेमुळे मुले घरात काय उपद्व्याप करत असतात याकडे घरच्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : घरी प्रयोग करत असताना ज्वलनशील पदार्थांचा भडका उडाल्याने वीस वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रयोग करताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपुरात (Nagpur) घडली आहे.
16 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर विद्यार्थ्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गौरव डाखोडे असे मयत महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. तो नागपुरातील एसएफएस महाविद्यालयातील बीसीएच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता.
गौरवने एक प्रोजेक्ट तयार करण्यासाठी घरी काही साहित्य घरी आणले होते. गौरव दुपारी घरात प्रयोग करत होता. हा प्रयोग करत असताना त्याने आणलेल्या साहित्याचा आणि पेट्रोलचा अचानक भडका उडाला. यामुळे त्याच्या कपड्यांना आग लागली आणि यामध्ये तो गंभीरित्या भाजला.
त्यानंतर त्याला तातडीने उपचारकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले. गौरवचे वडील प्रमोद डाखोडे केंद्र तपासणीच्या संबंधित एका विभागात नोकरीवर आहेत. 16 तारखेला घडलेल्या या घटनेनंतर गौरववर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच 19 तारखेला रात्री गौरवाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी गिट्टी विधान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गौरव नेमका कोणता प्रोजेक्ट तयार करत होता आणि त्यासाठी कोणते रसायने वापरत होता, आणि हा भडका नेमका कशामुळे उडाला याचा तपास पोलीस करत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मुले घरात काय उपद्व्याप करत असतात, कोणत्या वस्तू हाताळत असतात आणि त्याचा धोका आहे की नाही याकडे घरच्यांनी काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे