नागपूरच्या अश्लील डान्स प्रकरणी गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल
नागपूरच्या हॉटेलमध्ये अश्लील डान्स सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हॉटेलमध्ये एका खासगी कंपनीच्या पार्टीत चक्क अश्लील डान्स सुरु होता.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर: हॉटेलमध्ये अश्लील डान्स सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरमध्ये घडला होता. वर्धा रोडवरच्या हॉटेलमध्ये एका खासगी कंपनीच्या पार्टीत चक्क अश्लील डान्स सुरु होता. बिकिनीसदृश्य तोकड्या कपड्यांमध्ये तरुणी अश्लील डान्स करत होत्या आणि कंपनीचे कर्मचारी या तरुणीवर पैशांची उधळण करत होते. अश्लील नृत्य करणा-या तरुणीला काहीजण स्पर्शही करण्याचा प्रयत्न करत होते. नागपुरमधील या अश्लील डान्सचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. याप्रकरणी बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का?
खासगी कंपनीच्या कॉर्पोरेट पार्टीत तरुणी स्टेजवर अश्लिल डान्स करत होत्या. पार्टीत सहभागी झालेली कर्मचारी यांच्यावर नोटा उडवत होते. हॉटेल मालकानेही नियमांनी केराची टोपली दाखवत हा कार्यक्रम सुरु ठेवला होता. याप्रकरणी बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, असे अश्लील प्रकार करुन महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का असा संतप्त सवाल नागपूरकरांनी विचारला आहे.
काय घडलयं नेमकं?
नागपूर शहराच्या वेशीवर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये कॉर्पोरेट कंपनीच्या डीलर्स मिट आणि प्रॉडक्ट्स लॉंचिंग दरम्यान पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये अश्लील डान्सवर पैशांची उधळण केल्याचा प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कॉर्पोरेट कंपनीच्या इव्हेंट मॅनेजर तसेच हॉटेलच्या सेल्स मॅनेजरसह अन्य एक अशा तीन लोकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी दिली आहे. या पार्टीमध्ये कॉर्पोरेट कंपनीचे डीलर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी ही खास पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये काही तरुणींना अश्लील डान्स करत होत्या. कंपनीसाठी चांगली विक्री करणाऱ्या डीलर्सला चांगलं पारितोषिक देण्याच्या नादात कंपनीने अशा पद्धतीचे अश्लील नृत्याचे डान्सचं केलेलं आयोजन कितपत समाज हितकारक आहे हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
पार्टीत डान्स करणाऱ्या तरुणी कुठून आल्या होत्या?
पोलीस आयुक्तांच्या नियम अटीशर्तीच भंग केल्यामुळे विविध कलमान्वये तीन लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पार्टीत कोण कोण आलं होते? किती तरुणी आल्या होत्या? त्या कुठून आल्या होत्या? या सगळ्याचा पोलीस शोध घेत आहेत. हॉटेल व्यवस्थापनाकडून यासाठी पोलिसांची कुठली परवानगी घेतली नव्हती. तसेच झालेल्या प्रकारानंतरही पोलिसांना माहिती दिली नव्हती त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही दिवसापूर्वी नागपूरच्या उमरेड करांडला येथील एका हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने अश्लील नृत्य आणि पैसे उधळण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसानी गुन्हा दाखल करत कारवाई केली होती.