तीन वर्षांचे प्रेम संबंध अन् अचानक प्रेयसीची निर्घृण हत्या; नागपुरातल्या घटनेनं खळबळ
Nagpur Crime : गेल्या तीन दिवसांपासून विवाहित महिला बेपत्ता होती. चौकशीनंतर तिची निर्घृणपणे हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात (Nagpur News) गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. गंभीर गुन्ह्यामुंळे नागपुरात (Nagpur Crime) दहशत निर्माण झाली आहे. विवाहित महिलेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रियकरानेच विवाहित असलेल्या प्रेयसीची हत्या केली आहे. तीन दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती. आरोपीकडे चौकशी केल्यानंतर त्याने आपणच हे कृत्य केल्याचे कबुल केले आहे. पोलिसांनी (Nagpur Police) या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
विवाहीत महिलेची तिच्याच प्रियकराकडून दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. दीपक इंगळे असं खून करणाऱ्या प्रियकराचं नाव असल्याचे समोर आले आहे. विवाहित महिला तीन दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार 23 मार्चला वाठोडा पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी मृत महिलेचा तपास सुरु केला होता. पोलिसांनी तपासात मृत महिलेचे सीटी बसचालक दीपक इंगळे याच्याशी गेल्या तीन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे समोर आले.
चौकशी दरम्यान वाठोडा पोलिसानी दीपकला ताब्यात घेतल्यानंतर आपण महिलेचा खून केल्याची कबुली त्याने दिली. घटनेच्या दिवशी हिंगणा परिसरातील रुई शिवारत दीपक विवाहित महिलेला घेऊन गेला होता. विवाहित महिलेचे आणखी लोकांशी संबंध असल्याचा राग मनात धरून त्याचा वाद झाला होता. याच रागातून त्याने दगडाने ठेचून महिलेचा खून केला. यानंतर शनिवारी संध्याकाळी वाठोडा पोलिसानी मृतदेह ताब्यात घेतला.
धक्कादायक बाब म्हणजे महिला बेपत्ता झाल्याच्या दिवशीच तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे
पोलिसांनी काय सांगितले?
"संबधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर तिचा पती, मुले आणि आसपासच्या लोकांकडे विचारपूस करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की मयत महिलेले गेल्या दोन तीन वर्षांपासून दीपक इंगळे याच्योसोबत संबंध होते. त्याच्यासोबत महिलेचे बोलणे सुरु असायचे. त्यानुसार आम्ही दीपक इंगळे याला पोलीस ठाण्याला बोलवून त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपीने 23 मार्च रोजी हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शिवारातील निर्जन स्थळी महिलेला घेऊन गेला. आधी महिलेवर जबरदस्ती केली आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला. हिंगणा पोलिसांसह आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरु आहे," अशी माहिती वाठोड्याचे पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी दिली.