Nagpur Crime : गेल्या काही दिवसांमध्ये नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या (Nagpur Crime) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पोलिसांकडून (Nagpur Police) गुन्हेगारी रोखण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात असतानाही वारंवार अशा घटना घडताना दिसत आहेत. अशातच हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील डोंगरगाव परिसरात सोमवारी जुन्या वैमनस्यातून एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंगरगाव इथल्या आरके महाविद्यालय (RK Collage) परिसरात शिक्षकांसमोरच आठ जणांनी धारदार शस्त्रांनी वार करून अल्पवयीन मुलाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठही जणांना ताब्यात घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सक्षम कैलास तीनकर (वय 17, रा. शिरुळ, रिधोरा, ता. हिंगणा), असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तर सौरभ ऊर्फ बादशाह बस्ताराम पंधराम (वय 19, रा. राजारामनगर, चिचभवन) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. नागपूर पोलिसांनी बादशाहसह त्याच्या सात अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. बादशाह सोडून इतर आरोपी हे अकरावी आणि बारावीत शिकत आहेत. तर बादशाह हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्षम तीनकर हा बुटीबोरीतील पीयूसी सेंटरमध्ये काम करत होता. तर त्याचा मित्र मौसम रामटेके हा आरोपींसोबत महाविद्यालयात शिकत होता. काही दिवसांपूर्वी मौसमचा या मुलांसोबत वाद झाला होता. अल्पवयीन आरोपींना हा प्रकार बादशाहला सांगितला होता. हा वाद मिटविण्यासाठी बादशाहने मौसमला सोमवारी आरके विद्यालयाजवळ बोलावलं होतं. त्यावेळी सक्षम हा मौसमच्या मित्रांसह तिथे गेला. मात्र तिथेही दोन्ही गटामध्ये वाद झाले. वाद इतका वाढला की बादशाह आणि अल्पवयीन मुलांनी शस्त्रे बाहेर काढली. हा प्रकार पाहून मौसम आणि त्याचे मित्र पळून गेले. तर सक्षम हा आरके महाविद्यालयाच्या आवारात पळू लागला.


त्यावेळी बादशाहाने आणि त्याच्या साथीदारांनी सक्षमला महाविद्यालय परिसरातच गाठलं आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. हा सगळा प्रकार सुरु असताना महाविद्यालयातील वर्ग सुरु होते. मात्र कोणत्याही शिक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही. सक्षम रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्यानंतर हिंगणा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सक्षमला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून बादशाहला अटक केली आहे.