Nagpur Crime : आधी घड्याळ मागितलं मग चैन अन्... भाजप नेत्याला भररस्त्यात लुटलं
Crime News : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच दिवसाढवळ्या गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. मात्र या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपुरात (Nagpur News) सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसतेय. दिवसाढवळ्या गंभीर गुन्ह्याच्या (Nagpur Crime) घटनांमध्ये सातत्याने वाढत होत आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपुरचे प्रतिनिधित्व करत असूनही अशा घटना थांबता थांबत नाहीयेत. त्यामुळे आता गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा (Nagpur Police) धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे आता नागपुरात एका भाजप नेत्यासोबतच लुटमारीची घटना घडल्याचे समोर आले आहे. कारमधून आलेल्या आरोपींना भाजपच्या जेष्ठ नेत्याला लुटले आणि पळ काढला आहे. त्यामुळे आता आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
कारमधून आलेल्या तिघांनी मंदिराचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 70 वर्षीय भाजप नेत्याची लूट केली आहे. लॉ कॉलेज चौकात हा सर्व प्रकार घडलाय. रमेश मंत्री असं पीडित वृद्धाचे नाव असून ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गाडीतल्या तिघांपैकी एकाने पत्ता विचारला तर दुसऱ्या एकाने आपण मांत्रिक असल्याचे सांगतिले. यावेळीचे आरोपींनी रमेश मंत्री यांच्याकडील सोन्याचा ऐवज लुटला आणि पळ काढला. या घटनेत रमेश मंत्री खाली कोसळले आणि जखमी झाले.
नेमकं काय घडलं?
शनिवारी सकाळी रमेश मंत्री हे सायकलने सेमिनरी हिल्स येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी धरमपेठ येथील पॅन्टालून मॉलसमोरील रोडवर एक पांढऱ्या रंगाची ऑल्टो कार मंत्री यांच्या सायकलसमोर येऊन थांबली. गाडीमध्ये तीन व्यक्ती होत्या. त्यातील एकाने काळे कपडे घातले होते. तर बाकीचे दोघेजण पुढे बसले होते. त्यानंतर पुढे बसलेल्या एकाने मंत्री यांना पत्ता विचारत जवळ कुठे अंघोळीची व्यवस्था आहे का असे विचारले. त्यासोबत गाडीमध्ये असलेल्या अघोरी बाबाचे दर्शन घेण्यास सांगितले. मंत्री यांनी त्या बाबाचे दर्शन घेताच त्याने दहा रुपयांची नोट मागितली. यानंतर नोट मंत्र मारल्याचे सांगत त्यांना परत दिली. पुन्हा बाबाने मंत्री यांच्या हातातील घड्याळ मागितले आणि मंत्र मारून पुन्हा दिले.
त्यानंतर आरोपी बाबाने मंत्री यांच्या गळ्यातील 50 ग्रॅमची सोन्याची चेन व हातातील माणिक खडा असलेली अंगठी मंत्र मारण्यासाठी मागितली. मंत्री यांनीही ती काढून दिली. मात्र यावेळी आरोपी ते घेऊन पळ काढू लागले. त्याचवेळी कारचा धक्का लागून मंत्री खाली पडले आणि जखमी झाले. आरोपींनी मंत्री यांचा 4.50 लाखांचा सोन्याचा ऐवज घेऊन पळ काढला.
दरम्यान, याप्रकरणी रमेश मंत्री यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी तपासासाठी सीसीटीव्हीचा आधार घेतला असला तरी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाडीवर नंबर प्लेट नसल्याने तपासात अडचणी येत आहेत.