पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : गुरुवारी राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात रामनवमी (ram navami) उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र नागपुरात (Nagpur News) रामनवमीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. रामनवमी निमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा (Shobha Yatra) पाहण्याच्या नादात एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे बसण्याच्या वादातून एका व्यक्तीने या महिलेला धक्का दिल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी रामनवमीची शोभायात्रा पाहण्यासाठी गेले असताना बसण्याचा कारणावरुन मृत महिला आणि एका दाम्पत्यामध्ये वाद झाला. यानंतर झालेल्या झटापटीत तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू झाला. संतोषी बिनकर असे मृत महिलेचं नाव आहे. संतोषी या परिचारिका असून त्या कुटुंबियांसोबत रामनवमीची शोभा यात्रा पाहण्यासाठी गेल्या होत्या. रस्त्यावर गर्दी असल्याने संतोषी बिनकर या फॉर्च्युन मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून शोभायात्रा पाहण्यासाठी गेल्या होत्या.


यावेळी तिथे एक गरोदर महिला आणि तिचा पती बसून होता. यावेळी धक्का लागल्याचा कारणावरून संतोषी बिनकर यांच्या बहिणीचा गरोदर महिलेच्या पतीशी वाद झाला. याच दरम्यान भांडण थांबवण्यासाठी संतोषी बिनकर या तिथे गेल्या. मात्र संतोषी यांना धक्का दिल्याने त्या तिसऱ्या माळ्यावरुन खाली पडल्या. मात्र उपचारासाठी नेले असताना संतोषी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गरोदर महिला आणि पती निघून घटनास्थळावरुन निघून गेले. दरम्यान धंतोली पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे.


मध्य प्रदेशात 35 भाविकांचा मृत्यू


दरम्यान, मध्य प्रदेशात रामनवमीच्या उत्सवादरम्यान एका मंदिरात झालेल्या अपघातात 35 भाविकांचा मृत्यू झाला आहे. इंदूरमधल्या बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. त्यावेळी या मंदिरात असलेल्या पुरातन विहिरीचा भाग कोसळून अनेक भाविक या विहिरीत पडले. या अपघातात 35 भाविकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफसह लष्करानेही या ठिकाणी बचावकार्य सुरु केले. मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू असताना सकाळी 11.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे.