अमर काणे, झी मीडिया नागपूर : नागपूरमध्ये वृद्ध महिलेच्या हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस तपासात (Nagpur Police) सुनेनेच सासूच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं आहे. पण अवघ्या पाच वर्षांच्या मुलीने दिलेल्या माहितीमुळे हत्येचं गुढ (Murder Mystery) उकललं. याप्रकरणी सुनेसह दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. नागूपरच्या अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली. संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपी सुनेला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुनेने तिच्या चुलत भावांच्या मदतीने 2 लाखात सासूच्या हत्येची सुपारी दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना? सुनिता राऊत (54 वर्ष) असे मृत सासूचे तर वैशाली राऊत (32 वर्ष) असं आरोपी सुनेचं नाव आहे. पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर सुनिता राऊत या सून वैशाली आणि पाच वर्षाच्या नातीसोबत राहत होत्या. 28 ऑगस्ट रोजी हार्ट अटॅक मुळे सुनिता यांचा मृत्यू झाल्याचं सून वैशालीने सर्वांना कळवलं. त्याच दिवशी घाईघाईत सुनीता राऊत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.


पाच वर्षांच्या मुलीचा जबाब


मात्र सासू आणि सुनेत वाद झाला होता अशी चर्चा शेजारील लोकांमध्ये रंगली होती. दरम्यान दोन मामा रात्री घरात आले होते आणि त्यांनी आजीचा यांना गळा दाबला अशी माहिती वैशालीच्या पाच वर्षीय मुलीने काही नातेवाईकांसमोर दिली. सुनीता राऊत यांच्या मृतदेहावर घाईघाईत अंत्यसंस्कार आणि मुलीने दिलेल्या माहितीमुळे नातेवाईकांना काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. नातेईवाईकांनी याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाची सखोर चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.


पोलीस तपासात धक्कादायक माहिती


माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. शेजाऱ्यांनी सासू-सुनेत सतत भांडणं होत असल्याची माहिती दिली. त्यातच पाच वर्षांच्या मुलीने सांगितलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वैशाली राऊताल ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच वैशालीने हत्येची कबुली दिली. सासूच्या हत्येची सुपारी चुलत भाऊ श्रीकांत हिवसे आणि प्रकाश हिवसे यांनी दिल्याचं तीने सांगितलं. यासाठी दोन लाख रुपये देण्याचंही ठरलं. ठरल्यानुसार घटनेच्या दिवशी श्रीकांत आणि प्रकाश रात्री वैशाली हिच्या घरात आले आणि त्यांनी झोपलेल्या सुनीता राऊत यांचा गळा दाबून त्यांची हत्या केली.


पोलिसांनी सखोल चौकशी करत सून वैशाली तसंच तिचा भाऊ श्रीकांत हिवसे आणि प्रकाश हिवसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल अटक केली आहे. वैशालीचे दोन्ही चुलत भाऊ मध्यप्रदेशातील पांढुरणा जवळील पांढरागोडी इथे राहणारे आहेत. मृत सुनिता या वैशालीच्या चरित्रावर संशय घेत होत्या, तसेच सासूचा काटा काढला तर पूर्ण संपत्ती आपली होईल या विचारातून वैशालीने हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.