अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात मेलेली चिमणी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायतीमधील ही घटना आहे. नील शिंदेकर या मुलाला देण्यात आलेल्या पोषण आहारात  मेलेली चिमणी आढळली. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार (Poor Nutrition) देत असल्याचा आरोप करण्यात येतोय. यासंदर्भात, सरपंच आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना निवेदन दिलंय.दरम्यान, तक्रारीनंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीनं दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातही (Pune) अशाच एका घटनेनं खळबळ उडाली. शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचं समोर आलंय. तांदुळ, मटकीसह मुगडाळीत किडे आणि अळ्या आढळल्या. खेड तालुक्यातल्या बहुळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पोषण आहाराचा उपक्रम सुरू करण्यात आलाय. मात्र, यासाठी लागणारं धान्य निकृष्ट दर्जाचं असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होतायत.


नागपूर असो वा पुणे. दोन्ही घटनांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होतोय, हे वास्तव आहे. शालेय पोषण आहाराच्या नावाखाली नेमकं कोण कुणाचं पोषण करतंय, हा देखील मोठा सवाल आहे.


शालेय पोषण आहार योजना म्हणजे काय?
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसंच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचं प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी राज्यामध्ये 22 नोव्हेंबर 1995 पासून इयत्ता 1 ली ते 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येतं. राज्यामध्ये ही योजना राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानीत व अंशत: अनुदानीत शाळा, वस्तीशाळा, महात्मा फुले शिक्षण हमी योजना केंद्रे यांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते. 2008-09 पासून राज्यातील इयत्ता 6 वी ते 8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली.


सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेमध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ घरी न देता शिजवलेले अन्न (Cooked Food) द्यावे, असे आदेश दिले. त्यानुसार 2002 पासून या योजनेचे स्वरुप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेले अन्न देण्यात येत आहे. यासाठी काही संस्थांची नेमणुक करण्यात आली आहे. पण अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं जात असल्याच्या तक्रारी करण्यात प्राप्त झाल्यात.