जितेंद्र शिंगाडे, झी २४ तास, नागपूर : नागपूरमध्ये एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ नागपूरकरांची झोप उडवणारा आहे. पाऱ्याने केव्हाच चाळीशी पार केली असताना रस्त्यावर सरबतं, ताकासाठी थांबणं अगदीच स्वाभाविक आहे, पण या शीतपेयांसाठी कुठल्या बर्फाचा वापर केला जातोय, हे तुम्हीच पाहा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यावर कडेला ठेवलेला बर्फ चक्क एक कुत्रा चाटत आहे. नागपूरच्या धरमपेठ परिसरातला हा व्हिडीओ आहे. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी बर्फाचे किरकोळ विक्रेते आपले दुकान थाटून व्यवसाय करतात. थेट बर्फाच्या कारखान्यातून बर्फ विकत घेऊन परिसरातील छोटे दुकानदार, ठेलेवाल्यांना बर्फ विकतात. या व्हिडीओनंतर अन्न आणि औषध प्रशासनाला जाग आलीय. छोटे दुकानदार, बर्फाचे किरकोळ विक्रेते यांच्यावर कारवाई करायला सुरुवात झाली आहे. या विक्रेत्यांकडून अन्न आणि औषध प्रशासनाकडून नमुने घेतले जात आहेत.


दरम्यान मुंबईमध्ये सरबत, उसाचा रस आणि बर्फाचा गोळ्याचे ८१ टक्के नमुने दूषित असल्याचं समोर आलंय. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं मुंबईतल्या रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या लिंबू सरबत आणि उसाच्या रसाचे नमुने गोळा केले होते.


लिंबू सरबताच्या गोळा केलेल्या २८० नमुन्यांपैकी २१८ नमुने दूषित निघाले. तर उसाच्या रसाच्या ३०३ नमुन्यांपैकी २६८ नमुने दूषित निघालेत. बर्फाच्या ३८५ नमुन्यांपैकी ३०० नमुने दूषित आढळलेत.