COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमर काणे, झी २४ तास, नागपूर : राज्याच्या उपराजधानीमध्ये दहशत असलेल्या दाऊद, याकुब अन् मन्या यांच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत. आज रात्रीची यासाठी निवड करण्यात आली असून यासाठी वन विभागाची यंत्रणा सज्ज झालीय. आजची रात्र या तिघांच्या स्वैराचाराची शेवटची रात्र ठरणार आहे एवढ मात्र नक्की.. त्यांच्या धाकामुळे नागरिक बाहेर पडायला घाबरतायत. बायका-मुलांनी तर स्वतःला घरातच कोंडून घेतलंय. 


नागपुरच्या सुभाषनगरात या तिघांची दहशत आहे. दाऊद, याकूब आणि मन्या हे कुणी डॉल किंवा गुंड नव्हे तर परिसरात थैमान घालणारे वळू आहेत. गेल्या काही दिवसांपासून या तिघांनी प्रचंड धुडगुस घातलाय. लोकांना त्यांची एवढी भीती वाटतेय की ते घराबाहेर पडायला भितायत.


हे तीन सांड केव्हाही एकमेकांना भिडतात. त्यांच्या धडकांमध्ये कार, दुचाकी याचं प्रचंड नुकसान होतं. त्यांच्या मारामारीत मैदानाचं रेलिंग मोडलंय. संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. एका भाजी विक्रेत्याचा ठेला या वळुंनी उलटा केला. 


इथल्या मैदानांवर एरवी सकाळी लहान मुलं खेळायला यायची. मोठे मार्निंग वॉकला यायचे... ओपन जिममध्ये व्यायामही करायचे.. मात्र दाऊद, याकुब, मन्यानं वात आणलाय. त्यांच्या धास्तीनं पालकांनी मुलांना बाहेर पाठवणं बंद केलंय. 


आठवडाभरापासून या वळुंनी सुभाषनगरात थैमान घातलंय. मात्र महापालिका याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे नागरिक संतापलेत. 'वळू' या सिनेमासारखा एखादा 'फारेस्ट' येईल आणि आपली या जाचातून सुटका करेल, याची त्यांना प्रतीक्षा आहे.