Nagpur Hit And Run: बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी काँग्रेसची मदत? ठाकरेंचा उल्लेख करत...
Nagpur Hit And Run Sanket Bawankule Case: या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप होतोय. याच दाव्यांना एक नवा ट्वीस्ट मिळाला आहे.
Nagpur Hit And Run Sanket Bawankule Case: नागपूरमधील सीताबर्डी येथे 9 सप्टेंबर रोजी घडलेल्या हिट अँड रन दुर्घटनेमध्ये भारती जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुत्र संकेत बावनकुळेचं नाव समोर आलं आहे. मध्यरात्रीनंतर भरधाव वेगातील ज्या कारने पादचाऱ्यांना धडक देऊन जखमी केलं त्या कारमध्ये संकेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये संकेतला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अपघाताच्या दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मात्र आता याच प्रकरणामध्ये ठाकरेंच्या पक्षातील महिला नेत्याने वेगळीच शंका उपस्थित केली आहे. बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी भाजपाचं थेट काँग्रेसबरोबरच साटंलोटं आहे की काय असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला आहे.
काँग्रेसच्या भूमिकेवर शंका
काँग्रेसचे नागपूरमधील नेते विकास ठाकरेंनी या प्रकरणाशी संकेत बावनकुळेंचा काही संबंध नसून तसं असतं तर आम्ही त्यांना सोडलं असतं का? असा अर्थाचं विधान केलं. मात्र आता या विधानावरुन ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आक्षेप घेतला आहे. सीताबर्डी येथे पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी नागपूरमध्ये पोहोचलेल्या सुषमा अंधारेंनी विकास ठाकरेंच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.
नक्की वाचा >> Nagpur Hit & Run: 'कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय'; 'दोघे मृत्यूशी झुंज देत असताना...'
"विकास ठाकरेंच्या मतदारसंघातील घटना होती तर त्यांना सकाळीच व्यक्त व्हायला काय झालं होतं? 36 तास उलटून गेल्यावर व्यक्त झाले? यातील अपघातातील अर्जुन हावरे याचे वडील आणि ठाकरे यांचे वक्तव्य नेमका काय अर्थाअर्थी संबंध आहे. ते तथ्य समजून घेऊ. ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवारी यांचे एक स्टेटमेंट येतं. यानंतर विकास ठाकरे यांना असं स्टेटमेंट करावसं वाटतं याचाच अर्थ कुठेतरी भाजपाच्या लोकांना मदत करण्यासाठी काही स्थानिक नेते पुढे आले आहेत. मी काँग्रेसचे नेते असं म्हणणार नाही. नागपूरचे काही स्थानिक नेते अग्रेसर आहेत का?" असा सवाल सुषमा अंधारेंनी केला आहे.
नक्की वाचा >> '...मग संकेत बारमध्ये दूध प्यायला गेलेला का?' बावनकुळेंना Hit & Run वरुन सवाल
सोशल मीडियावरुनही टोला
"संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी सत्ताधारी तर प्रयत्न करतच आहेत पण काँग्रेसच्या विकास ठाकरेंनीही प्रयत्न करावेत हे माझ्यासाठी कमालीचे अनाकलनीय आहे. पोलीस स्वतः सांगताहेत की संकेत त्या गाडीमध्ये होता आणि विकास ठाकरे म्हणतात संकेतचा संबंधच नाही..!! घोर कलियुग," अशी पोस्टही त्यांनी केली आहे.
आता या प्रकरणावर अंधारेंनी नोंदवलेल्या मतानंतर काँग्रेस तसेच विकास ठाकरे काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.