Nagpur hit and run case : पुण्यातील कल्याणी नगर परिसरामध्ये बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने आलिशान पोर्शे कारने दारुच्या नशेत दोघांना रस्त्यावर चिरडल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी विशाल अग्रवाल, त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याची आई आणि आजोबा या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यातच आता नागपूरमध्ये एका वेगवान कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. 


6 जण जखमी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका वेगवान कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडले. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.


मृतांमध्ये एका महिलेचा समावेश


मध्यरात्री 12.15 च्या सुमारास फुटपाथवर तीन महिला, चार मुले आणि एक पुरुष असे आठ जण झोपले होते. त्यावेळी हा अपघात घडला. यावेळी भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट फुटपाथवर चढली. या घटनेतील मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात भरधाव कारचालकांचा बेदकारपणाचे सत्र सुरुच असल्याचे दिसत आहे. 


कारचालकाला अटक केल्याची माहिती


नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ भीषण अपघात झाला. एका कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केल्याची माहिती मिळत आहे. तसेच यावेळी कारमध्ये भूषण लांजेवार, सौरभ कंडुकर, वंश झाडे, सन्मय पात्रेकर, अथर्व बानाईत, अथर्व मोघरे आणि ऋषिकेष चौबे हे सात मित्र होते. हे सात जण एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. ही पार्टी केल्यानंतर परतत असताना हा अपघात घडला. हे सर्व तरुण 20 ते 22 वयोगटातील असून वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.